आनंदी व मंगलमय दिवस

<<श्रुती उरणकर>>

सामाजिक जीवनात सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र यावे, आनंदाने व सलोख्याने राहावे. आपापसातील भेदभाव, उचनीचता नष्ट व्हावी म्हणून हिंदुस्थानी संस्कृतीत गुढीपाडव्याला अधिक महत्त्व आहे. हिंदुस्थानात आणि विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणजे विशेष मुहुर्ताचा दिवस. समाजातील कोणत्याही कार्यासाठी शुभदिवस म्हणून या दिवसाला महत्त्व आहे. मानवजातीचे कल्याण करावे म्हणून या देशातील सण व उत्सव समाजात दीपस्तंभाचे कार्य करतात. समतेच्या मार्गदर्शनाने जीवनात चैतन्य निर्माण करतात. आजची गुढी हे त्याचेच प्रतीक आहे. एकविसाच्य शतकाचे आधुनिक तंत्रज्ञान, शैक्षणिक विकास, प्रसार माध्यमातून होणारे मनोरंजन आज कितीही स्पर्धा करीत असले तरी संस्कृतीच्या चालीरीतीचा रंग कधीही फिका पडलेला नाही. होळी, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, मकरसंक्रांत हे उत्सव व सण वेगवेगळे असले तरी त्यातील भावना, प्रेम आणि उत्साह सदैव द्विगुणीत होतात. या दिवशी स्त्र्ााr-पुरुष आनंदाने एकत्र येतात. चांगली वस्रे परिधान करून सुग्रास भोजनाने दिवस आनंदात घालवतात. स्रिया घरासमोरील अंगणात तुळशीवृंदावनासमोर रांगोळी काढतात. पूर्वी गुढी उभारण्यासाठी चांदीचा कलश व जरीचे वस्र वापरले जाई. आता वस्राऐवजी भगवा झेंडा किंवा नवीन रंगीबेरंगी वस्त्राला काठीला बांधून, त्यावर गडू किंवा छोटा तांब्या उपडा ठेवून त्यावर झेंडूंच्या फुलांची माळ व साखर माळ बांधतात. ग्रामीण भागात ही गुढी तुळशीवृंदावनाच्या बाजूला बांधली जाते. शहरात खिडकीवर काठीच्या सहाय्याने ही गुढी बांधली जाते. असा हा सण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो. त्यातच महाराष्ट्रातील डोंबिवली हे एक सांस्कृतिक शहर, याच डोंबिवलीतील गणेश संस्थांनने याच दिवशी शोभायात्रा काढून इतिहास घडविला. आता तर इतरत्र मुंबई व ठाणे जिह्यांत या दिवशी अशा शोभायात्रा काढून हा दिवस आनंद व मंगलमय वातावरणात घालवतात. या शुभदिनी विद्यार्थ्यांनी संकल्प करून भरपूर अभ्यास ठरविले पाहिजे, आपली प्रगती आपल्याला कशी साधता येईल व त्याचप्रमाणे कष्ट करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. हा विचार सतत मनात ठेवला पाहिजे. आचरण, मंगल व सात्त्विक करण्याचा निश्चय जरूर करावा.