शुभ संक्रांत

1

<< दा. कृ. सोमण >>

संक्रमण काल. सूर्याचा मकर राशीत प्रवेश. संक्रांतीचे स्वरूप काय आहे यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन…

हिंदू सण, उत्सवांची रचना फार प्राचीन काळी करण्यात आली आहे. त्याकाळी आजच्यासारखी भौतिक साधने उपलब्ध नव्हती. तसेच लोकसंख्या कमी होती. प्रवास – दळणवळणाची साधनेही आत्ताच्यासारखी नव्हती. हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे. आजच्यासारखे कारखाने त्याकाळी नव्हते. त्याकाळी शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले ठेवणे हाच उद्देश सणांची रचना करण्यामागे होता. ऋतूंप्रमाणे आहारात बदल केला तर शरीराचे आरोग्य चांगले राहते. म्हणून सणांची रचना ऋतूंवर आधारलेली आहे. उत्सवांची रचनाही शेतीच्या कामांच्या वेळापत्रकानुसार तसेच ऋतूंवर करण्यात आली आहे. उत्सवाच्या निमित्ताने नातेवाईक – मित्रमंडळी एकत्र येतात त्यामुळे प्रत्येकाला आनंद प्राप्त होतो आणि मनाचे आरोग्य चांगले राहण्यास त्यामुळे खूप मदत होते. म्हणून सण – उत्सव समजून घेताना प्रत्येक गोष्टींचा कालसापेक्ष अर्थ समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. मकर संक्रांतीच्या सणाबाबतही असेच आहे.
आज शनिवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून ३८ मिनिटानी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या वर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला आली आहे.

संक्रांतीचे वर्णन

या वर्षीच्या मकर संक्रांतीचे वर्णन पहा – ‘मकर संक्रांती ‘गरज’ करणावर होत आहे. म्हणून वाहन हत्ती असून उपवाहन गाढव आहे. तिने तांबडे वस्त्र परिधान केले आहे. हातात धनुष्य घेतले आहे. गोरोचनाचा टिळा लावला आहे. वयाने प्रौढ असून बसलेली आहे. वासाकरिता बेल घेतला आहे. दूध भक्षण करीत आहे. राक्षस जातीची आहे. भूषणार्थ गोमेद रत्न धारण केले आहे. वारनाव आणि नाक्षत्रनाव राक्षसी आहे. ती दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. ईशान्य दिशेस पाहत आहे.’ सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करताना त्यावेळी जे ‘करण’ असते त्यावर हे वर्णन अवलंबून असते. संक्रांती ज्या वस्तूंचा स्वीकार करते त्या वस्तू महाग होतात. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी होते. आणि ज्या दिशेला जाते किंवा पाहते त्या दिशेला उत्पात होतात असेही सांगण्यात आले आहे.
अर्थात हे वर्णन कधीही बरोबर येत नाही. कारण त्यामागे कोणताही वैज्ञानिक नियम नाही. ‘या वर्षी ती दूध पीत आहे म्हणून दूध दोन रुपयांनी महाग झाले आहे’ असेही काही लोक म्हणतील! परंतु या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. कारण ते नेहमीच बरोबर येते असे नाही. लोक या सर्व वर्णनाकडे गांभीर्याने पाहत नाहीत, हे अगदी खरे आहे. आणि ते स्वागतार्ह आहे.
मात्र काही समाजकंटक संक्रांतीच्या नावावर गैरसमज पसरवतात. हे योग्य नाही. संक्रांतीचे हे वर्णन आता कालबाह्य झाले आहे, म्हणून अलीकडच्या पंचांगात संक्रांतीचे हे वर्णन कमीच देण्यात येत असते.

वैज्ञानिक सत्य!

सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून उत्तर गोलार्धात दिनमान वाढू लागते. आर्यांचे पूर्वज उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते तेव्हापासून हा सण प्रचारात आला असावा असेही सांगितले जाते. या प्रदेशात सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सूर्याचे किरण प्रथम भूप्रदेशात पडतात त्यावेळी आनंद वाटणे साहजिकच आहे. काही विद्वानांच्या मते उत्तरायणाचा आरंभ हा पूर्वी वर्षारंभाचा दिवस असावा. कारण याच दिवशी शिशिर ऋतूचा प्रारंभ होतो. महाभारतात एकेठिकाणी ‘ऋतवः शिशिरादयः’ असे म्हटलेले आहे. कालांतराने यांत बदल झाला असावा. वसंत ऋतू हा वर्षारंभाचा पहिला ऋतू मानला गेला असावा. पंचांगे निरयन पद्धतीची असल्याने संक्रांत ही निरयन मकर राशीप्रवेशाप्रमाणे साजरी केली जाते. वास्तविक सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करतो त्या २१ डिसेंबरपासूनच दिनमान वाढत जात असते. म्हणून २१ डिसेंबर हाच उत्तरायणायणारंभाचा – शिशिरऋतू प्रारंभाचा दिवस महत्त्वाचा असतो.
संक्रांत ही वाईट असते, अशुभ असते हाही एक गैरसमज आहे. दिनमान वाढत जाणे हे वाईट व अशुभ कसे असू शकेल उलट ती एक चांगली गोष्ट असते. शुभ गोष्टच आहे. आनंदाचीच गोष्ट आहे. त्यामुळे चांगली गोष्ट झाली त्यावेळीच संक्रांत आली असे म्हटले पाहिजे. संक्रांतीने संकरासुर राक्षसाला ठार मारले आणि दुसऱया दिवशी संक्रांतीदेवीने किंकरासुर राक्षसाला ठार मारले असे प्राचीन कथेत सांगितले गेले आहे. संक्रांती देवीने जर राक्षसाना ठार मारले तर ते वाईट कसे असेल?

मकर संक्रांत ही नेहमी १४ जानेवारीलाच येते हेही खरे नाही. आपले सर्व सण हिंदू कालमापनावर अवलंबून असताना नेमका मकर संक्रांतीचा सण इंग्रजी कालमापनावर अवलंबून कसा ? असेही विचारले जाते. पण मकर संक्रांती नेहमी १४ जानेवारीलाच येते यांत काहीही तथ्य नाही. सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबरला येत होती. सन १८९९ मध्ये मकर संक्रांती १३ जानेवारीला आली होती. सन १९७२ पर्यंत निरयन मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. सन १९७२ पासून सन २०८५ पर्यंत निरयन मकर संक्रांती कधी १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल. अशा रीतीने निरयन मकर संक्रांतीचा दिवस पुढे जात जात सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती १ फेब्रुवारीला येणार आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की मकर संक्रांतीचा आणि १४ जानेवारी या तारखेचा तसा संबंध नाही.

फार प्राचीन कालापासून मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळगूळ देण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीच्या दिवसात खूप थंडी असते. थंडीमध्ये तीळ आरोग्यास खूप चांगले असतात. थंडीमध्ये आपली त्वचा कोरडी होते. तिळाचे तेल लावल्याने त्वचा तेजस्वी होते. वर्षभर ज्यांच्याशी मतभेद झाले असतील, भांडण झाल्याने अबोला धरला गेला असेल तर या दिवशी ‘तीळगूळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून, तिळगूळ खाऊन संबंध चांगले सुधारता येतात. मकर संक्रांतीच्या दिवसात महिला काळ्या रंगाची वस्त्र परिधान करतात. कारण वस्त्राचा काळा रंग या थंडीच्या दिवसात उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतो.
आज आपण सर्वांना ‘शुभ संक्रांत’ म्हणूया! तिळगूळ खाऊन केवळ गोड नव्हे तर नीट बोलूया! आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नीट बोलण्याबरोबर एकमेकांशी नीट वागूया !