कर्नाटकातून लोकसभा निवडणूक लढवा, राहुल गांधींना सिद्धरामैय्या यांची ऑफर

सामना ऑनलाईन । बंगळुरू

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणूक कर्नाटकातून लढवावी असे आवाहन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी केले आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी तसेच माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील कर्नाटकातून निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. 20 वर्षांनंतर याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांनी कर्नाटकातून निवडणूक लढवून विकासाच्या नवा आदर्श घालून द्यावा,  अशी मागणीही सिद्धरामैय्या यांनी ट्वीट करून केली आहे.

‘हिंदुस्थानचे पुढचे पंतप्रधान असा उल्लेख करत राहुल गांधी यांनी कर्नाटकातून निवडणूक लढवावी. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास व उत्साह निर्माण होऊन त्याचा पक्षाच्या यशावर चांगला परिणाम होईल’, असे सिद्धरामैय्या यांनी म्हटले आहे. शनिवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची कर्नाटकच्या उमेदवारांची नावं निश्चित करण्यासंबंधी बैठक होत आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी कर्नाटकातून निवडणूक लढवण्याची जोरदार मागणी कर्नाटक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश गुंडूराव आणि सिद्धरामैय्या यांनी शुक्रवारी केली आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1978 मध्ये कर्नाटकातल्या चिकमंगळूरमधून, तर सोनिया गांधी यांनी बेल्लारी लोकसभा मतदार संघातून 1999 साली यशस्वी निवडणूक लढवली होती. याचा दाखला देत, 20 वर्षांनंतर याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांनी देखील कर्नाटकातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा सिद्धरामैय्या यांनी व्यक्त केली आहे. काही दिवस अगोदर राहुल गांधी यांनी सिद्धरामैय्या यांची ही मागणी नाकारली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा सोशल मीडियावर #RaGafromKarnataka या हॅशटॅगने राहुल गांधी यांनी कर्नाटकातून निवडणूक लढवण्याच्या मागणीने जोर धरला. कर्नाटकाने नेहमीच काँग्रेस नेत्यांना साथ दिली आहे. त्यामुळे इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांचे अनुकरण राहुल गांधी यांनी करावे आणि कर्नाटकातून निवडणूक लढवावी असे सिद्धरामैय्या यांनी म्हटले  आहे.