सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार शहीद कॅप्टन विक्रम बत्रा याची भूमिका

सामना ऑनलाईन । मुबंई

कारगिल युद्धात शौर्य गाजविणारे शहीद जवान कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्यात येणार आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारणार आहे. कॅप्टन बत्रा यांच्या कुटुंबियांनीच या भूमिकेसाठी सिद्धार्थ मल्होत्राचे नाव सुचविल्याचे समजते. या चित्रपटात सिद्धार्थ डबल रोल साकारणार असून तो विक्रम बत्रा यांचा जुळा भाऊ विशालची देखील भूमिका करणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही.

‘कारगिलची लढाई हा आपल्या देशवासियांसाठी खूप संवेदनशील विषय आहे. अवघे २४ वर्षाचे असताना विक्रम बत्रा यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. गेल्या वर्षी एका कार्यक्रमादरम्यान बत्रा कुटुंबियांची भेट झाली होती. तेव्हाच मी यावर चित्रपट करण्याचे ठरवले होते. हा चित्रपट तयार करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे’, असे सिद्धार्थने इतेफ्फाक या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सध्या या चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू आहे. मे २०१८ मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. उत्तर हिंदुस्थानात या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग होणार आहे. या चित्रपटातील प्रत्येक घटना अगदी खरी वाटली पाहिजे म्हणून आम्ही खूप मेहनत घेत आहोत. चित्रपट वास्तवादीच भासावा म्हणून लोकेशन्सवरच चित्रपटाचे शूटिंग होणार. तसेच सध्या मी या चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकत असून लवकरच रायफल चालविण्याचे देखील धडे घेणार आहे, असे देखील सिद्धार्थने सांगितले. कारगिल युद्धात शहीद झालेले जवान शहीद विक्रम बत्रा यांना त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्कार देण्यात आला होता.