साधा माणूस, गलेलठ्ठ पगार,माहिती काढूनच संघवींना केले टार्गेट

1
siddharth-sanghavi-murderer

सामना ऑनलाईन, मुंबई

कमला मिल कंपाऊंडच्या पार्किंग एरियात काम केल्यामुळे एचडीएफसी बँकेत कोण कोण काम करतो, कोणाकडे किती पैसा आहे, याची इत्यंभूत माहिती सर्फराज शेख याने काढली होती. सिद्धार्थ संघवी साधा माणूस होता. त्यांच्याकडे साधी कार होती. पण त्यांचा पगार गलेलठ्ठ होता. ही माहिती काढल्यानंतर पैसे मागण्यासाठी सर्फराजने संघवी यांना टार्गेट केले होते, अशी माहिती संघवी हायप्रोफाइल हत्याप्रकरणात समोर आली आहे.

कौपरखेरणे येथे राहणारा सर्फराज शेख याने एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले असले तरी पोलीस सर्फराजच्या सांगण्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. संघवी यांच्या हत्येमागे दुसरे काही कारण आहे का, या गुह्यात आणखी कोणाचा हात आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सर्फराज कमला मिलमध्ये जात होता. त्याने एचडीएफसीत कोण कोण काम करतो व कोणाचा किती पगार आहे याची माहिती काढली होती. त्याने एक दुचाकी खरेदी केली होती. कर्जाचे पैसे भरण्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती. म्हणून त्याने संघवी यांना टार्गेट केले होते. 5 तारखेला संघवी यांना पार्किंग एरियात गाठायचे आणि त्यांच्याकडे 35 हजारांची मागणी करायची, असे त्याने ठरवले होते. त्यानुसार त्याने संघवी यांना चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणीदेखील केली होती. पण पैसे देण्यास नकार देत संघवींनी विरोध करण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांची हत्या केल्याचे सर्फराज सांगत असल्याचे सांगण्यात आले.

सीसीटीव्हीचे फुटेज अस्पष्ट

कमला मिल परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीत संघवी यांची सुझुकी इग्नीस कार जाताना दिसते. परंतु कारमध्ये किती लोक आहेत, कार कोण चालवत आहे ते अस्पष्ट फुटेजमुळे स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.