सिद्धिविनायक ट्रस्टचा पुढाकार: रायगड जिल्ह्याला मिळणार १२ डायलिसीस मशीन

सामना प्रतिनिधी । पनवेल

सध्या सर्वत्र किडनी निकामी होण्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून अनेकदा रुग्णाला डायलिसीसची गरज भासते. रायगड जिल्ह्यात केवळ अलिबाग आणि पनवेल येथेच डायलिसीस सेंटर असून हे उपचार घेण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णांना लांबचा प्रवास करून यावे लागते. त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आता किडनी रुग्णांची ही फरपट थांबणार असून रायगड जिल्ह्याला १२ डायलिसीस मशीन उपलब्ध होणार आहेत. मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टने या कामी पुढाकार घेतला असून रायगडवासीयांसाठी हे एक वरदानच ठरणार आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय वगळल्यास अद्ययावत सोयी, सुविधा असलेली रुग्णालये पनवेल येथेच आहेत. प्रथमोपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णाला पनवेल अथवा मुंबईला हलविण्यात येते. त्यामुळे रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यासाठी रायगड जिल्ह्यातील रुग्णांना डायलिसीसची उपचार वेळेत घेता यावेत या उद्देशाने मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती ट्रस्टने जिल्ह्यात १२ मशीन देण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रात एकूण १०२ ठिकाणी हे मशीन देण्यात येणार असून रायगडमधील अलिबाग जिल्हा रुग्णालय, महाड आणि माणगाव येथे प्रत्येकी चार अशी एकूण १२ मशीन देण्यात येणार आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून ही सामाजिक मदत करण्यात येणार असल्यामुळे त्याला सरकारी मंजुरीची आवश्यकता असते. मात्र आता सरकारने याला मंजुरी दिली असून तांत्रिक बाबी पूर्ण होताच चारही ठिकाणी मशीन देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

कोटय़वधींचा खर्च
डायलिसीसच्या एका मशीनची किंमत सुमारे साडेसहा लाख रुपये इतकी असून महाराष्ट्रात एकूण सात कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अलिबाग, मुरुड, रोहा, माणगाव या ठिकाणाहून रुग्णाला पनवेलपर्यंत नेण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचा बिकट रस्ता पार करावा लागतो. शिवाय खर्चदेखील येतो. या तीन भागात डायलिसीस मशीन आल्यास हजारो रुग्णांची गैरसोय दूर होणार असून पैशाचीही बचत होणार आहे.

…‘ट्रस्टच्या माध्यमातून सध्या अनेक रुग्णांची गरज ओळखून डायलिसीस मशीन मोफत देण्याचे ठरविले आहे. रायगडात 12 ठिकाणी मशीन देण्यात येणार असून लोकांनी केलेल्या दानातून लोकांचीच गरज भागावी हा ट्रस्टचा उद्देश आहे. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण होताच डायलिसीस मशीन देण्यात येतील.’- आदेश बांदेकर, अध्यक्ष, सिद्धिविनायक मंदिर न्यास, मुंबई.