‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ बंद होणार?

सामना ऑनलाईन । मुंबई

मागील काही दिवसांमध्ये मालिका आणि त्यावरून निर्माण झालेले वाद हे समीकरणच झालं आहे. ‘पहरेदार पिया की’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ नंतर आता प्रेक्षकांना निखळ मनोरंजनाचा आनंद देणारी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

शीख समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत या मालिकेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या मालिकेतील एका भागात एका कलाकारानं शीख समाजाचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंद सिंग यांची भूमिका साकारली होती. मात्र शीख धर्मीयांनी यास आक्षेप घेतला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (एसपीजीसी) प्रमुख कृपाल सिंग बांदुगर यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘या मालिकेत शीख समाजाचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंद सिंग यांच्याबाबत चित्रिकरण करून शीख समुदायाच्या भावना दुखाल्या गेल्या आहेत.’ कोणताही अभिनेता किंवा व्यक्ती गुरू गोविंद सिंग यांची बरोबरी करू शकत नाही असं ही ते म्हणाले. तसेच दिग्दर्शक व निर्मात्यांना हा भाग टीव्हीवर प्रसारित करू नये असं आवाहन बांदुगर यांनी केलं आहे.