पाकिस्तानात शीख पोलिसाला मारहाण;घरातून हाकलले!

सामना ऑनलाईन । लाहोर

पाकिस्तानात शीख पोलीस अधिकाऱ्याला पोलिसांनीच बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलल्याची घटना उघडकीस आली आहे. गुलाबसिंह शहीन यांना देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत त्यांनी सांगितलेल्या आपबितीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही पोलीस अधिकारी मंगळवारी आपल्या घरात घुसले. त्यांनी माझे केस ओढले आणि बायको-मुलांसमोर मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर त्यांनी माझे घर सील केले असे त्यांनी सांगितले. शीखांना पाकिस्तानबाहेर काढण्यासाठी अशी दडपशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

डेरा चहल गावात शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या जमिनीवर असलेल्या लंगर हॉलच्या बाजूला गुलबासिंह परिवारासाह राहतात. मंगळवारी काही पोलिसांनी घरात घुसून मारहाण केली. जबरदस्तीने घराबाहेर काढत असताना मी पगडी आणि चप्पल घालण्यासाठी १० मिनिटांचा वेळ मागितला. मात्र, त्यांनी तेवढा वेळही मला दिला नाही. १९४७ नंतर फाळणीच्या काळापासून माझे कुटुंब येथे राहत असल्याचे त्यांनी सांगितले. इव्हाक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डच्या आदेशावरून ही वागणूक देण्यात आल्याचा आरोप गुलबासिंह यांनी केला आहे. बोर्डचे सेक्रेटरी तारीक अन्वर यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला. बोर्डचे अध्यक्ष सय्यद असीफ अख्तर हश्मी यांच्याविरोधात ट्रस्टची जमीन बेकायदेशीर विकल्याप्रकरणी आपण २०११ मध्ये एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर बोर्डने दडपशाही सुरू केल्याचे गुलाबसिंह यांनी सांगितले. गुरद्वाराच्या हटल परिसरात काहीजण बेकायदेशीर वास्तव्य करत होते. त्यांना बाहेर काढून ट्रस्टची जागा सील करण्यात आल्याचे बोर्डकडून सांगण्यात आले.

शीखांना पाकिस्तानबाहेर काढण्याचे कारस्थान
फाळणीनंतरही अनेक शीख आणि हिंदू पाकिस्तानात राहत आहे.दंगलीच्या काळातही आम्ही देश सोडला नाही. मात्र, आता शीखांना देशाबाहेर काढण्यासाठी दडपशाही करून अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप गुलबासिंह यांनी केला आहे.