रेशमी दिवस भरजरी दिवस

पूर्णिमा ओक, फॅशन डिझायनर

गुलाबी थंडी… खाण्याची रेलचेल आणि रेशमी वस्त्रं… आता फॅशन जगतात आपल्या भारदस्त, मराठमोळय़ा साडय़ा अजून देखण्या आणि ट्रेण्डी झाल्या आहेत. या देखण्या वस्त्रांनी थंडीही रेशमी झाली आहे.

रेशमी वस्त्रांची… भरजरी प्रावरणांची आपली समृद्ध परंपरा… येवल्याची पैठणी, पुण्याची नारायणपेठ, इरकल, टोपपदरी, खण किती नावं घ्यावीत.  पूर्वी ही महावस्त्र्… राजवस्त्र काही विशेष प्रसंगी, विशेषतः लग्नसराईलाच कपाटातून किंवा बासनातून बाहेर पडायची. एरव्हीच्या दिवसात लवंग, तमालपत्र नाहीतर फिनाईलच्या गोळ्यांचा वास अंगोपांग वागवत ही वस्त्र कायम विसावलेलीच असायची.

काळानुसार फॅशन बदलली. ही पारंपरिक वस्त्रही आधुनिक होऊ लागली. आधुनिकतेच्या बदलाने सुखावत या पारंपारिक साडय़ांनी जुनेपणाची कात टाकत आपली पारंपारिकता काळनुरुप नव्या वस्त्रात नटवली… सजवली… त्यामुळे या वस्त्रांचे स्वरुप आता केवळ साडय़ांपुरतेच मर्यादित न राहता विविध ड्रेसेसमध्ये ही पारंपरिकता बेमालूम मिसळली आणि अजूनही देखणी झाली.

गुलाबी थंडीचे हे दिवस खरोखरच गुलाबी आणि देखणे असतात. खाण्यापिण्याची रेलचेल, भरपूर मनोरंजन आणि मनाजोगा पोशाख परिधान करण्याचे दिवस… जवळपास संपूर्ण वर्ष आपण उकाडय़ाला तोंड देत सुती वस्त्रावर आपली फॅशन निभवून नेतो. पण आता थंडीच्या दिवसांत मात्र सगळी रेशमी वस्त्र् नटा-सजायला सज्ज होतात. आपल्या नव्या… आधुनिक रूपात.

पैठणी आज फॅशन जगतात अत्यंत लोकप्रिय आहे. साडीची मर्यादा तिने कधीच ओलांडली आहे. देखणे दुपट्टे, लांब किंवा आखूड कुर्ते, जॅकेट, ड्रेसेस, गाऊन अशा विविध रूपांत ती आपल्यासमोर येते. फॅशन फोटोशूटमध्ये आम्ही पैठणीवर अक्षरशः असंख्य प्रयोग करतो. तिच्या काठांचा वापर किंवा संपूर्ण पैठणीच काठासारखी भरलेली. इव्हिनिंग गाऊन्समध्ये पैठणीचे सौंदर्य खुलून येते. तिचा झळाळता रंग भरगच्च काठ, मोर, पोपट भरलेली नक्षी.

खणाच्या कापडाचेही ड्रेसेस खूप सुंदर होतात. पंजाबी ड्रेसमध्येही खणाचा खूप सुंदर वापर करता येतो. खणाची चोळी ही संकल्पना आता खूप नव्या रूपात समोर येते आहे.

इरकलीच्या चपला बनवल्या

आतापर्यंत आम्ही सगळ्या प्रकारच्या रेशमी वस्त्रांचे क्लचेस, मोबाईल कव्हर्स,  इरकलची सॅक बनवली आहे. कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे असतो त्यादिवशी काहीतरी नेण्यापेक्षा या पारंपरिक कपडय़ाच्या सॅक दिसायला पण वेगळ्या आणि भन्नाट वाटतात. इरकलीच्या चपला बनवल्या आहेत. इरकलीच्या काठापासून बांगडय़ा आणि गळ्यातले बनवता येते. त्याच्यामध्ये पेंडण्ट वापरून तुम्ही वापरू शकता.

पुरुषांच्या वस्त्रांमध्ये पैठणी, इरकल

केवळ स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही पारंपरिक कपडय़ाचा वापर त्यांच्या पेहरावात करता येतो. आम्ही त्यांच्या शेरवान्या बनवतो. त्यांच्या पेहरावासाठी सगळ्या प्रकारच्या रेशमी वस्त्रांचा वापर करुन बनवता येतो. पूर्वीच्या काळात राजे-महाराजांचे पेहरावात पैठणीचा वापर केलेला असायचा. मला असं वाटतं की, जर आपण त्या वस्त्रांचा वापर केला तर आपली संस्कृती अशीच टिकून राहील. पारंपरिक कपडे आजच्या ट्रेण्डमध्ये आणण्याचा माझा प्रयत्न असतो.

नारायणपेठ साडी

नारायणपेठ साडीचा थेट संबंध महाराष्ट्राशी आहे… या साडीचे वीणकाम आंध्र प्रदेशातील नारायणपेठ या गावातील करतात. म्हणून ती नारायणपेठ म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६३० मध्ये ‘नारायणपेट’ या गावी काही काळ मुक्काम केला होता. तेव्हा त्यांच्याबरोबर काही विणकर वास्तव्याला होते. तेथे ते साडी विणण्याचे काम करू लागले. याच विणकरांनी पुढे विशेष अशा रेशमी साडय़ा बनवायला सुरुवात केली. त्यांना ‘नारायणपेठ’ साडी अशी ओळख मिळाली. रेशमी साडी विणायला चार-पाच दिवस लागतात. सोलापूरला तयार होणाऱया नारायणपेठ साडय़ांवर चित्रांच्या स्वरूपात अजिंठा-वेरुळ लेण्यांचे देखावे असतात. पदरावरील रुद्राक्ष ही येथील नारायणपेठ साडीची खासियत आहे.

 पैठणी

पैठण या गावावरुन ‘पैठणी’ हे त्या साडीला नाव पडले. साडीप्रमाणेच पैठण हे पैठणी, पीतांबर व धोतर यासाठी प्रसिद्ध आहे. सतराव्या शतकात रघोजी नाईक या सरदाराने शामदास वालजी नावाच्या एका गुजरात्यास हाती धरून पैठणहून येवलेवाडीला पैठण विणणारे काही कसबी कारागीर आणून तेथे पेठ वसवली आणि त्यांच्याकडून पैठणीचे उत्पादन सुरू केले. पैठणीच्या निर्मितीत अनेक कारागीरांचा हातभार लागतो. हिरवा, पिवळा, लाल, कुसुंबी हे पैठणीचे खास रमंग. पैठणी तयार करण्यासाठी एकवीस दिवस लागत. त्यांपैकी केवळ पदराच्या विणकामासाठी सात दिवस खर्ची पडत. नव्या युगात यंत्रसामग्री आली असली तरी पदराचे काम हातांनीच केले जाते. त्यात सोन्याचा धागा ओवायचा, मग जरीच्या रंगीत धाग्यांनी नक्षी काढायची हे काम कुशल कारागीर करतात.

रेशमी वस्त्र् वापरताना

 रेशमी कपडे घेताना ते अस्सल रेशमी असल्याची खात्री करून घ्या.

हे कपडे स्वच्छ व कोरडय़ा जागीच ठेवा.

रेशमी कपडे सुती कापडात गुंडाळून ठेवले तर त्यांचे रंग जास्त दिवस टिकतात.

झुरळे, वाळवी अशा कीटकांचा उपद्रव होणार नाही अशा ठिकाणी रेशमी कपडे ठेवावेत.

खूप प्रकाश व खूप दमटपणा यापासून रेशमी कपडे दूर ठेवा.

रेशमी कपडे स्वच्छ पाण्याने धुवावेत. पाणी कठीण असल्यास त्यात अमोनिया मिसळावा.

कोमट पाण्यात चांगल्या दर्जाच्या अंगाच्या साबणाचे तुकडे वापरुन रेशमी कपडे हळुवार धुवावेत.

रेशमी कपडे धुतल्यानंतर त्यात साबणाचा अंश अजिबात रहाणार नाही याची काळजी घ्यावी.

धुलाई पूर्ण झाल्यावर थंड पाण्यात थोडे सायट्रिक अँसिड घालून रेशमी कपडे त्यातून काढावेत.

रेशमी कपडे धुऊन झाल्यावर पिळून घ्यावेत व सावलीत वाळवावेत.

इस्त्री करताना रेशमी कपडय़ांवर पाणी शिंपडू नये.

इरकल साडी

सोलापुरातील इरकल साडय़ा प्रसिद्ध आहेत. इरकलचा साडीचा काठ पैठणीप्रमाणे असतो. मात्र हिच्या एका काठात जाड आणि बारीक असे दोन पैठणी काठाचे पट्टे असतात.  इरकल साडय़ांचे वैशिष्टय़ म्हणजे या साडय़ांवर कसुटीची नक्षी असते.  या साडय़ांवर कसुटीचे नक्षीकाम केलेली आणि पारंपरिक जपणारी पालखी, हत्ती, पोपट, मोर यांची चित्रे असतात. या साडय़ांचे पदर लांब असून त्यावर मंदिरांची रचना असते. पदराचे रेशीम लाल रंगाच्या रेशमाने तयार करतात. पदराचा शेवटच्या भागावर पर्वतरांगांसारखे आकार असतात. ही साडी दोन रंगांत असून धूपछांव साडी म्हणूनही त्याची ओळख आहे. इतकंच नाही तर या इरकल प्रकारात ड्रेस मटेरिअल, कुर्ते मिळतात.