३१ किलो चांदीची गणेशमूर्ती साकारतेय रजतनगरीत

34

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

एकेकाळी कापूसनगरी असलेल्या खामगावला शुद्ध चांदीमुळे रजतनगरी अशी नवी ओळख मिळाली असून येथील चांदीची चकाकी सातासमुद्रापार पोहोचत आहे. स्वातंत्र्यपूर्ण काळापासून खामगाव शहर हे जगाच्या नकाशावर कापासाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. यामुळे खामगाव शहरात रेल्वे स्टेशनची निर्मिती सुद्धा करण्यात आली. याच काळात खामगाव शहरात चांदीचा उद्योग भरभराटीस आला. त्यामध्ये खामगाव येथील विश्वकर्मा सिल्वर हाऊसचे नाव संपूर्ण जगात नावारुपास आले आहे. स्व. जगदीशप्रसाद जांगीड यांनी स्थापन केलेल्या विश्वकर्मा सिल्वर हाऊसला 125 वर्ष पुर्ण झाले आहे. या विश्वकर्मा सिल्वर हाऊसमध्ये ३१ किलो चांदीची गणेशमूर्ती साकारत आहे. त्यासाठी तीन कारागीर 13-13 तास परिश्रम घेत असल्याची माहिती संचालक कमलसेठ जांगीड यांनी ‘सामना’शी बोलताना दिली.

जांगीड यांनी दिलेल्या माहितीनुसार ही भव्य 31 किलो चांदीची गणेशमूर्ती संभाजीनगर येथील यादगार गणेश मंडळासाठी तयार करण्यात येत आहे. तर नागपूरच्या राजासाठी सुमारे 3 किलोपेक्षाही जास्त वजनाचे सोन्याचे चरण देखील विश्वकर्मा सिल्वर हाऊसमध्ये तयार करुन पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. विश्वकर्मा सिल्वर हाऊसमधून हिंदुस्थानसह परदेशात येथील चांदीपासून दरवाजे, प्रभावळ, मुकूट, पूजेचे साहित्य बनवून देण्यात आले आहे. याशिवाय महराष्ट्र राज्यासोबत इतर राज्यातील मोठ्या देवस्थानांमध्ये येथील चांदीपासून निर्मित वस्तू लावण्यात आल्या आहे. विविध देवी-देवतांच्या मूर्ती, मुखवटे, पूजेचे साहित्य, प्रभावळ, सिंहासन, छत्र यासोबतच पानदान, डिनरसेट अशा एक ना अनेक कलाकृती चांदीपासून बनविण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी विविध मूर्ती, मुशक, मोदक देखील चांदीचे बनविण्यात येत असून भाविकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या