तजेलदार आणि कोमल त्वचेसाठी काही सोपे उपाय

सामना ऑनलाईन | मुंबई

निरोगी आरोग्यासाठी जशी संतुलित आहाराची गरज असते तशी तजेलदार आणि कोमल त्वचेसाठी त्याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी स्वयंपाकघरातीलच काही घटक वापरून सौंदर्य आणखी खुलवू शकता.

  • प्रत्येक स्वयंपाकघरात आवर्जून आढळते ते म्हणजे ‘मध’. मध आरोग्यासाठी गुणकारी आहेच, पण ते सौंदर्यासाठीही तितकेच उपयुक्त आहे. मधातील ऑण्टिबॅक्टेरियल व दमटपणा राखण्याच्या गुणधर्मामुळे त्वचेचे संरक्षण होते. त्यासाठी मधात हळद, मलाई, बेसन एकत्र करून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. ते सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवा.
  • एका बाऊलमध्ये हळद आणि चंदनाची पेस्ट करा. त्यात अंदाजानुसार दोन ते तीन चमचे दूध टाका आणि मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून काही वेळ चेहऱयावर मसाज करा. त्यानंतर काही वेळ हे मिश्रण चेहऱ्यावर ठेवा. सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
  • दालचिनीचे तेल किंवा पावडर ऑलिव्ह ऑईलमध्ये एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत होते. तसेच ओठांची चकाकी वाढते.
  • ग्रीन टी ही आरोग्यदायी असल्याबरोबरच चेहऱ्याच्या सौंदर्यासाठीही गुणकारी आहे. एका भांडय़ात अर्धा कप पाणी उकळत ठेवा व त्यात ग्रीन टीच्या दोन बॅगा बुडवा. त्या पंधरा मिनिटे तशाच राहू द्या. काही वेळाने थंड झालेल्या ग्रीन टीचा चेहऱ्यावर हबका मारा व चेहरा स्वच्छ धुवा.
  • उन्हातून फिरल्याने चेहरा काळवंडणे ही समस्या सगळ्यांनाच जाणवते. त्यासाठी शहाळ्याच्या पाण्यात लिंबाचे थेंब टाकून काही मिनिटांत चेहरा स्वच्छ धुवा. त्वचेत पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
  • गरम मसाल्यातील एक घटक म्हणजे काळी मिरी. ऑण्टिऑक्सिडंटनी परिपूर्ण असलेली काळी मिरी याचा स्क्रब म्हणून वापर करता येतो. एक चमचा दह्यामध्ये चमचाभर काळी मिरीची पूड एकत्र करून घ्या. त्याचा लेप चेहऱ्यावर लावा. पाच-दहा मिनिटांनी चेहरा सुकल्यावर धुऊन टाका. मात्र हा पॅक लावताना डोळ्यांची काळजी घ्या.