10 खासगी सावकारांच्या घरावर जिल्हा सहकार विभागाचे छापे

सामना प्रतिनिधी । शिरोळ

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील शहरात बेकायदेशीरपणे खासगी सावकारी करणाऱ्या दहा सावकराच्या निवासस्थानी जिल्हा सहकार विभागाने छापा टाकून कारवाई केली. सावकारांमध्ये शहरातील राजकीय पदाधिकारी, व्यावसायिक, सहकारी संस्थेचे पदाधिकारी, यांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये सावकारांच्या निवास्थानातून रोख साडेनऊ लाख रुपयांसह बेकायदेशीर दस्त, कागदपत्रे वाहनांची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. जिल्हा सहकार निबंधक अरुण काकडे व सांगली जिल्हा उपनिबंधक नीलकांत करे, शिरोळचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. सहकार विभागाने आज केलेल्या अचानक कारवाईने खासगी सावकारांच्या धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, या गंभीर गुन्ह्याबाबत कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या संदर्भात रात्री उशिरापर्यंत अधिकार्‍यांची कारवाई सुरू होती. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरात खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. अवाच्या सव्वा व्याज व दंड आकारून कर्जदाराची आर्थिक पिळवणूक होत असल्याने एका अज्ञात व्यक्तीने शहरातील 10 खासगी सावकारांच्या विरुद्ध लेखी तक्रार जिल्हा निबंधक केली होती. त्यानुसार जिल्हा निबंधक अरुण काकडे यांनी या निनावी अर्जाची शहरात शहानिशा करून कारवाई करण्याचा सापळा रचला होता. यामध्ये 10 सावकार यांची नावे असल्याने एकाच वेळी 10 पथके तयार करून खासगी सावकारांच्या घरावर गुरुवारी सकाळी 11 वाजता अचानक छापा टाकण्यात आला. दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. तब्बल 5 तास सुरू असलेल्या या कारवाईमुळे शहरातील अवैद्य व्यासायिक आणि खासगी सावकारांचे धाबे दणाणले आहे. या कारवाई मध्ये जिंनाप्पा रंगराव पवार, जिंनाप्पा गणपती आधीरे, सहदेव माळी, ज्योतिबा लक्ष्मण जाधव, विराज भीमराव सावगावे, भरत महावीर टोणे, सागर सिद्ध कब्बूरे, (सर्व राहणार कुरुंदवाड) तर राजू सुरेश शिंदे दिगंबर आदम (राहणार भैरेवाडी) आणि शंकर कागले (राहणार मजरेवाडी तालुका शिरोळ) यांचा समावेश आहे.

कुरुंदवाड शहरात खासगी सावकारांच्या विरोधात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या भरारी पथकाने अत्यंत गुप्तपणे अचानक छापा टाकून कारवाई केल्याने शहरातील 10 सावकारांच्या कडे फोटो, कोरे स्टॅम्प, चेक, वाहनांची आरसी बुक, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या किल्ल्या, मुदत, खरेदीदस्त यासह रोख रक्कम सोने-चांदी सापडली आहेत. सकाळी 11 च्या सुमारास सुरू झालेली कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे खासगी सावकाराचे धाबे दणाणले आहे.

गोपनीय कारवाई
दहा सावकरांची यादी असल्याने एकाच वेळी सर्व सावकारांच्या घरावर छापा टाकण्यासाठी 10 पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकामध्ये प्रमुख म्हणून एक सहायक निबंधक होते. तर सर्व पथकात एकूण 80 ते 90 अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. प्रत्यक्ष कारवाईच्या ठिकाणी जाईपर्यंत पथकातील कोणत्याही सदस्याला याची माहिती दिली नव्हती. कारवाई अत्यंत गोपनीय ठेवल्याने यशस्वी झाली.