कडक ‘रोहिट’; दोन वर्षात टोलावले 200 षटकार

2

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर 7 विकेटसनी मात केली. या सामन्यात 50 धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या रोहित शर्माने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. या खेळीदरम्यान रोहितने आणखी एका यादीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. 1 जानेवारी 2016 पासून आतापर्यंत रोहितने आपल्या कडक “रोहिट”चा आविष्कार सादर करीत दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 च्या वर षटकार ठोकले आहेत. रोहितची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही तुफानी कामगिरी तोच ‘षटकारांचा सिकंदर’ असल्याचे सिद्ध करणारीच ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील षटकारांच्या कामगिरीत रोहित ( 349 ) चौथ्या स्थानावर असला तरी 1 जानेवारी 2016 पासून आतापर्यंत त्याने 200 षटकार नोंदवत “षटकारांचा बादशाह” ही उपाधी मिळवण्याच्या दिशेने जोरदार कूच केले आहे. या यादीमध्ये मार्टीन गप्टील, कॉलिन मुनरो, विराट कोहली यासारखे सर्व फलंदाज रोहितच्या मागे आहेत. न्यूझीलंडच्या भूमीत हिंदुस्थानने पहिला टी-20 विजय नोंदवला. 3 सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थान सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी होणार आहे. त्यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ टी-20 मालिकेतही विजय मिळवण्याची सुवर्णसंधी हिंदुस्थानी संघाकडे आहे. त्यामुळे पूर्ण बहरात फलंदाजी करणारा कर्णधार रोहित शर्मा अखेरच्या लढतीतही प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेणार असा विश्वास टीम इंडियाच्या सर्व क्रिकेटपटूंना आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार

शाहिद आफ्रिदी            पाकिस्तान      476

ख्रिस गेल                    वेस्ट इंडीज      476

ब्रेण्डन मॅक्युलम           न्यूझीलंड         398

सनथ जयसूर्या             श्रीलंका           352

रोहित शर्मा                 हिंदुस्थान        349

महेंद्रसिंग धोनी            हिंदुस्थान        348

ए. बी. डिव्हिलीयर्स      द. आफ्रिका      328

 

2016पासून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार

रोहित शर्मा                 हिंदुस्थान        202

मार्टिन गप्टील             न्यूझीलंड         110

कॉलीन मुन्रो                न्यूझीलंड         104

एरॉन फिंच                 ऑस्ट्रेलिया       90

बेन स्टोक्स                  इंग्लंड             89

जोस बटलर                 इंग्लंड             85

विराट कोहली             हिंदुस्थान        81