सिंधू राष्ट्राची स्थापना शक्य आहे काय?

3

<< पडसाद >> 

जेथे सिंधू संस्कृती अस्तित्वात आली तो सिंध प्रदेश आज पाकिस्तानात आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून सिंधमधील सिंधी समाज संकटात आहे. हजारो वर्षे जुन्या सिंध संस्कृतीचा अभिमान असलेला सिंधी समाज आजही आपल्या अस्मितेच्या शोधात आहे. सध्या साज अग्रवाल यांच्या विस्थापित सिंधी समाजाच्या वेदनांवर लिहिलेल्या ‘सिंध और सिंधी’ नामक पुस्तकाने मोठी खळबळ माजवली आहे. खरोखरच सिंधू राष्ट्राची स्थापना शक्य आहे काय?

जगाच्या नकाशात हिंद महासागराच्या शेजारी अरबी समुद्र दाखवण्यात आलेला आहे. वास्तविक अरबी संस्कृती या सागरापासून फार दूर आहे. सर्वात जवळ आहे तो सिंधी संस्कृतीचा प्रदेश! गेली अनेक शतके जगभर सिंधू संस्कृतीचा मोठा बोलबाला आहे. त्यामुळे सिंधू सागर असे नाव असणे औचित्यपूर्ण आणि अर्थपूर्ण ठरले असते. परंतु नकाशावर मात्र वर्षानुवर्षे अरबी समुद्र असेच नाव आहे. सिंध संस्कृतीचे पाईक कोणत्या भीषण परिस्थितीत जगताहेत हेही जगाला फारसे माहिती नाही. हिंदुस्थानचे विभाजन हे काही नैसर्गिक नाही. पाकिस्तानचा जन्म धर्म आणि लोकसंख्येच्या आधारावर झाला. पाकिस्तानात मुस्लिम अधिकृत नागरिक ठरला आणि भलेही कितीही प्राचीन संस्कृतीचा का असेना, मुस्लिम नसेल तर तो निर्वासित ठरला. विभाजनाची ही रेषा येथील मूळ निवासींच्या दुर्भाग्याची रेषाच ठरली. एवढे होऊनही फाळणीनंतर सिंध संस्कृतीचे पाईक असलेला सिंधी समाज हतोत्साहित झाला नाही. आपली मातृभूमी सोडायची नाही असा त्यांनी निर्धार केला. परंतु जे तेथेच राहिले त्यांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. असे नसते तर पाकिस्तानात स्वतंत्र सिंधू राष्ट्राच्या आंदोलनाचा जन्मच झाला नसता.

फाळणीनंतर जे हिंदुस्थानात आले त्यांनी आपले नवे विश्व निर्माण केले. राजकीयदृष्टय़ा हिंदुस्थानात सिंधी समाज हा अल्पसंख्याक ठरला. परंतु अर्धशतकातच त्यांनी विभाजनाने जे गमावले होते ते सारे परत आपल्या कर्मसिद्धांताआधारे पुन्हा कमावून घेतले. जगभरात सिंधी समाजाप्रमाणेच पारशी आणि यहुदी समाजाचीसुद्धा परवड झाली. परंतु यहुदी समाजाने आपल्या भीमपराक्रमाने स्वतःचा स्वतंत्र देश इस्त्रायलच्या रूपात अस्तित्वात आणला. जगभरात पसरलेला पारशी समाज पुन्हा इराणमध्ये परतला नाही. तो आहे तेथेच आपला देश मानून त्या त्या देशाशी एकनिष्ठ राहिला. कठोर परिश्रमांच्या जोरावर कुणी टाटा बनले, तर बुद्धीच्या जोरावर कुणी भाभा बनले.

गेल्या काही दिवसांत एक नवीन पुस्तक बाजारात खळबळ माजवत आहे. साज अग्रवाल नावाच्या एका सिंधी निर्वासित महिलेच्या मुलीने हे पुस्तक लिहिले आहे. ‘सिंध और सिंधी’ नामक हे पुस्तक कोलकात्यातील ऑक्स्फर्ड स्टोअरने प्रसिद्ध केले. पुस्तकात सिंधी समाजाची व्यथा मांडलेली आहे. फाळणी नैसर्गिक नसल्याने त्याचा सर्वात मोठा फटका सिंध प्रांताला बसला. ध्यानीमनी नसताना एका फटक्यात आणि एका रात्रीत सिंध हा पाकिस्तानचा भाग होऊन बसला. परिणामी विभाजनानंतर तत्काळ सिंधी समाजातून प्रतिक्रिया आली की, जी आपली कर्मभूमी, मातृभूमी आणि धर्मभूमी सोडायची नाही. परंतु पाकिस्तानच्या अत्याचाराचा वरवंटा सिंध प्रदेशावरून फिरला आणि आत्यंतिक अत्याचारातून सुटका म्हणून सिंधी समाजाला विस्थापित व्हावे लागले. लेखिकेने आपल्या पुस्तकात विस्थापित होण्याचे दुःख काय असते तेच मांडलेले आहे. पुस्तकातील कथा ही लेखिकेच्या आईची आपबीती आहे. साज अग्रवाल यांची आई १३ वर्षांची असताना त्यांना आपले घरदार आणि राहता प्रदेश सोडून विस्थापित कसे व्हावे लागले व त्यात त्यांनी काय हाल भोगले याचे या पुस्तकात सत्यकथन आहे.

सरहद्द गांधी खान अब्दुल गफ्फार खान, जियो सिंधचे नेते ज़ा एम़ सय्यद आणि अब्दुल वाहिद आरेसर यांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या प्रत्येकाला पाकिस्तानात मोठा जाच सहन करावा लागला. सिंधी समाजालाही विस्थापित होण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पुस्तकात लेखिकेच्या आईच्या अनुभवाशिवाय इतर काहीही नाही. त्यात मातृभूमी सोडावी लागण्याचे दुःख आहे आणि मातृभूमीचा सुगंधही आहे. ज्यांनी हे दुःख अनुभवले त्यांनाच ते कळेल असे हे पुस्तक आहे. लेखिकेच्या मातेचा सर्वात शेवटी जो प्रश्न उपस्थित केला तो वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही. त्या म्हणतात, मी पुन्हा माझ्या मातृभूमीचे दर्शन घेऊ शकेन काय? माझ्या धरतीत जन्माला आलेली अंगाई गीते त्याच भूमीत जाऊन ऐकू शकेन काय? सिंधी समाजाने तर कधी फाळणीला मान्यता दिलेली नव्हती. बर्लिनची भिंत कोसळू शकते तर मग आम्ही का आमच्या सिंध प्रांतात जाऊन राहू शकत नाही? यहुदींसाठी इस्त्रालय निर्माण होऊ शकतो, तर सिंधींसाठी सिंध राष्ट्र का होऊ शकत नाही?

पत्रकार सय्यद जलालुद्दीन लिखित पुस्तक ‘डिवाईड पाकिस्तान टू एलिमिनेट टेररीझम’ यात म्हटले आहे की, दहशतवाद नष्ट करायचा असेल तर एकच उपाय आहे पाकिस्तानचे किमान सहा तरी तुकडे झाले पाहिजेत. स्वतंत्र सिंध राष्ट्र अस्तित्वात आले पाहिजे. त्यांच्या या पुस्तकाने केवळ पाकिस्तानातच नव्हे तर संपूर्ण नाटो राष्ट्रांमध्येही खळबळ माजवली होती. हे पुस्तक अमॅझॉन डॉटकॉमच्या युनिव्हर्सल इनकॉर्पोरेटेड संस्थेने प्रकाशित केले आहे. पाकिस्तानने त्याला मोठा विरोध केला. २००५ मध्ये संजीव भटनागर यांनी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यात म्हटले होते की, हिंदुस्थानमध्ये सिंध हा प्रांतच नाहीय़े त्यामुळे राष्ट्रगीतातून सिंध हा शब्द काढून टाकण्यात यावा. परंतु न्यायालयाने ही याचिका केवळ फेटाळलीच नाही तर दहा हजारांचा दंडही लावला. विभाजनानंतर आचार्य कृपलानी काँग्रेसचे अध्यक्ष होते, चोथराम गिडवाणीसहित सर्वच नेते नेहरूंची हाजी हाजी करीत राहिले. राम जेठमलानी म्हणतात, सिंध निव्वळ भौगोलिक प्रांत नव्हे. त्याचा इतिहास, संस्कृती आणि अस्मितेचे आंदोलन आज सीमेपलीकडे चालू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या पुस्तकात ’हिंदुत्वात सिंधू, सप्त सिंधू आणि सिंधू वीर’नामक लेख लिहिलेला आहे. १९२३ मधील हे लेखन आजही प्रासंगिक ठरते. सिंधू संस्कृतीविषयी बोलणे ही काही मुस्लिम किंवा इस्लामविरोधी गोष्ट नव्हे. सिंधू संस्कृतीतूनच दशमान पद्धती, पंचांग आणि मातृशक्तीपूजन यांचे वर्णन मुस्लिम इतिहासकारही मान्य करतात. विद्रोही कवी शेख अयाज, अब्दुल वाहिद आरेसर, अमर जलील आणि इमदाद हुसैनी यांनी यासंदर्भात लिहिलेले आहे. नज्म अब्बासी यांनी लिहिले की अरब सागर हे चुकीचेच आहे ते सिंध सागरच असायला हवे. पाकिस्तानी जेलमध्ये आयुष्य व्यतीत केलेले जियो सिंधचे नेते म्हणतात आणि १५ हजार वर्षांपासून सिंधी आहोत आणि लाखो वर्षांपासून हिंदू आहोत. आमचे आयुष्य मोजू नका. सिंधू राष्ट्राचे निर्माण करा.