सिंधुदुर्गात परिवर्तनाची भगवी लाट निश्चित -आमदार वैभव नाईक

सामना ऑनलाईन । मालवण प्रतिनिधी

पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघात घराघरात सर्वसामान्य जनतेचा मिळणारा उत्स्पुर्त प्रतिसाद लक्षात घेता शिवसेना उमेदवारांचा विजय निश्चित आहे. वकिली पेशा सांभाळताना सामाजिक बांधिलकी जोपासत समाजकार्याचा वसा अविरत सुरु ठेवणाऱ्या जिल्हापरिषद उमेदवार रुपेश परुळेकर यांना गावागावात मिळणारा पाठींबा पाहता परिवर्तनाच्या भगव्या लाटेत शिवसेनेचा भगवा पेंडूर मतदार संघातही फडकेल, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी पेंडूर येथे बोलताना व्यक्त केला.

पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ कट्टा येथे रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उमेदवार अॅड.रुपेश परुळेकर, प्रदीप सावंत, प्रसाद तेली यांच्यासह बबन शिंदे, शिवा भोजने, बाबू टेंबुलकर, देवा रेवडेकर, दर्शन म्हाडगूत, देवयानी मसुरकर, श्वेता सावंत, दीपा शिंदे व शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

गावागावात जनतेला अपेक्षित असलेल्या शाश्वत विकासासाठी शिवसेनेला साथ द्या, असे आवाहनही आमदार नाईक यांनी यावेळी केले. जनतेला परिवर्तन अपेक्षित आहे. आणि परुळेकर, सावंत, तेली यांच्यासारखी मंडळी सर्वसामान्य जनतेचा चेहरा म्हणुन निवडणुक रिंगणात आहेत. रुपेश परुळेकर यांच्यासारखे उच्चशिक्षित व्यक्तिमत्व भविष्यात आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आपला ठसा राजकारणातही उमटविल असा विश्वासही आमदार नाईक यांनी व्यक्त केला.