उंदराने केला घात, मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

सामना ऑनलाईन । सिंधुदुर्ग

कणकवलीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कणकवलीच्या खारेपाटण येथे अंगणात कपडे वाळत घालताना एका महिलेला विजेचा धक्का लागला आणि तिला वाचविण्यासाठी गेलेला तिचा मुलगाही तारेला चिकटला. त्यामुळे यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. भाग्यश्री शिंदे (६०) आणि त्यांचा मुलगा संजय शिंदे (३५) अशी या मायलेकाची नावं आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

गुरुवारी दुपारी दुपारच्या सुमारास अंगणात बांधलेल्या तारेवर कपडे वाळत घालताना भाग्यश्री यांना विजेचा धक्का लागला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांना वाचविण्यासाठी मुलगा संजय धावत आला, मात्र तोही तारेला चिकटला. दोघांच्याही किंकाळ्या ऐकून त्यांच्या घरातील एक ७५ वर्षांची वृद्ध महिला धावत मदतीला आली. तिने सावधपणे लाकडी दांड्याने प्रहार करून दोघांची सुटका केली. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

अंगणात कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तार घराच्या ज्या वाशाला बांधली होती, तेथे असलेल्या बल्बची वायर उंदराने कुडतरली होती. त्यामुळे बल्ब लावलेल्या वायरमधून विजपुरवठा कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तारेला झाला आणि ही दुर्घटना घडली. या नंतर दोघांनाही तात्काळ खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे शिंदे कुटुंबीयांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे.