..अन्यथा आठ दिवसात मत्स्य कार्यालयाचे स्थलांतर

मत्स्य कार्यालयात नव्याने पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांचे स्वागत करताना मच्छिमार प्रतिनिधी. (अमित खोत)

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण शहरात असलेले सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालय कुंभारमाठ येथे उपलब्ध झालेल्या जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय झालेला आहे. मच्छीमार प्रतिनिधींमार्फत मालवण बसस्थानक परिसरालगत मत्स्य कार्यालयास जागा उपलब्ध झाल्यास कार्यालय शहरातच राहील अन्यथा हे कार्यालय येत्या आठ दिवसात कुंभारमाठ येथे स्थलांतरित केले जाईल, अशी माहिती प्रभारी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी शुक्रवारी दिली.

सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालय याठिकाणी रिक्त असलेल्या पाच जागांवर तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सतीश खाडे – परवाना अधिकारी मालवण, प्रतीक महाडवाला – परवाना अधिकारी देवगड, व रश्मी अंबुलकर – सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या तिघांनी पदभार स्वीकारला. या सर्वांचे श्रमिक मच्छीमार संघ व श्रमजीवी रापण संघ यांच्या वतीने मत्स्य व्यवसाय कार्यालयात स्वागत करण्यात आले. यावेळी विकी तोरसकर, छोटू सावजी, बाबी जोगी, डॉ.जितेंद्र केरकर यासह मत्स्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री दीपक केसरकर व आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नामुळे अधिकारी नियुक्त झाल्याचे बाबी जोगी यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रदीप वस्त यांनी माहिती देताना सांगितले, रिक्त पदांचा प्रश्न काही प्रमाणात सुटल्यामुळे पर्ससीन बंदी कालावधीत अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर गस्ती नौकेद्वारे लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. मात्र रिक्त जागा भरल्या असल्या तरी धोकादायक बनलेल्या कार्यालय इमारतीचा प्रश्न कायम आहे. कार्यालय स्थलांतर करण्यासाठी कुंभारमाठ येथे जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी कार्यालय स्थलांतर केले जाईल. मात्र ते अंतर लांब असल्याने मालवण बस स्थानक परीसरालगत सर्व किनारपट्टी गावातून येणाऱ्या मच्छिमारांचा विचार करता जागा उपलब्ध झाल्यास कार्यालय कुंभारमाठ येथे स्थलांतरित होणार नाही. मात्र आठ दिवसात मालवणात जागा उपलब्ध न झाल्यास कुंभारमाठ बरोबरच ओरोस येथे कार्यालय स्थलांतर करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे वस्त यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांचे लेखी पत्र आणावे

मत्स्य कार्यालय स्थलांतरास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्थगिती दिली आहे. असे काही मच्छीमार नेत्यानी जाहीर केले. मात्र कार्यालय स्थलांतरास पालकमंत्र्यांची स्थगिती असल्याचे लेखी पत्र मच्छीमार नेत्यानी द्यावे असे प्रदीप वस्त यांनी सांगितले. त्यामुळे कार्यालय स्थलांतर विषय तापण्याची स्थिती निर्माण झाली आहे.