सिंधुदुर्ग पोलिसांची ‘अतिदक्षता’ मोहीम

सागरी सुरक्षा मोहिमेत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी. (अमित खोत)

सामना प्रतिनिधी । मालवण

२६/११ सारखे दहशतवादी हल्ले समुद्रातच परतवून लावण्यासाठी सागरी सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. या सागरी सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. या पार्श्वभूमीवर विशेष अशा ‘अतिदक्षता’ मोहिमेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग पोलिसांनी मालवण शुक्रवारी किनारपट्टीवर विशेष मोहीम राबविली.

बुधवारी २० रोजी या मोहिमेचा शुभारंभ पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते सिंधुदुर्ग नगरी येथे करण्यात आला. त्यानंतर ३ दिवस पोलीस अधीक्षक कार्यालयात सागरी सुरक्षेच्या दृष्टीने शोध बचाव व मुकाबला याबाबतचे प्रशिक्षण अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले. या तीन दिवसीय प्रशिक्षणा नंतर शुक्रवारी मालवण किनारपट्टीवर सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. दहशतवाद्यांशी कसा सामना करायचा याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. या प्रात्यक्षिक कार्यक्रमात पोलिसांच्या तीन स्पीड बोट, प्रतिकात्मक स्वरूपात आतंकवाद्यांची बोट या मोहिमेत सहभागी होती. यावेळी सिंधुदुर्ग अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, रत्नागिरी जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितेश गटे, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, मोरे, गवस, कोस्टगार्ड कमांडर अभिषेक करूणाकर, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, २० अधिकारी, ३३ कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

कोकण किनारपट्टीवरील पहिलीच मोहीम
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोकण किनारपट्टीवरील पोलीस अधिकाऱ्यांना गुजरात येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या प्रशिक्षणानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टीवर ही विशेष मोहीम राबविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली.