सिंधुदुर्गात तीन केंद्रांवर होणार मतदान, २१२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील मतदान केंद्रांची यादी सोमवारी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली आहे. सिंधुदुर्गात २१२ मतदार निश्चित झाले असून कणकवली, कुडाळ व सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांचा कक्ष तीन मतदान केंद्रे म्हणून जाहीर केले आहे.

२१ मे रोजी ही निवडणूक होत असून २४ मे रोजी रत्नागिरी येथे मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी हे त्या त्या जिह्यात काम पाहणार आहेत. सिंधुदुर्ग जिह्यातील मतदान केंद्रांची मतदान केंद्रे सोमवारी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, नगर पंचायती, नगर परिषद, पंचायत समिती व तहसीलदार यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांसाठी निरीक्षक म्हणून राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे अव्वर सचिव संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्वीकृत नगरसेवकांना वगळले

मतदार यादीनुसार ५० जिल्हा परिषद सदस्य, आठ पंचायत समित्यांचे सभापती, जिह्यातील आठही नगरपालिका व नगर परिषद यांच्या नगराध्यक्षांसह लोकनियुक्त नगरसेवक व स्वीकृत नगरसेवक मिळून १५४ मतदार आहेत. मात्र ही यादी अंतिम करण्यापूर्वी कणकवली नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवडणूक प्रक्रिया झाली नव्हती. त्यामुळे या नगर परिषदेच्या दोन स्वीकृत नगरसेवकांना मतदार यादीत स्थान मिळाले नाही.