दरोडा घटनेच्या निषेधार्थ सिंदखेडराजा एक दिवसीय सर्वपक्षीय बंद

2

सामना प्रतिनिधी । सिंदखेडराजा

जिजामाता नगरमधील रहिवाशी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यासिन शेख यांच्या राहत्या घरी गुरुवारी दिवसा ढवळ्या दुपारी दोन वाजता तलवारीने हल्ला झाला. शहरातील चोर्‍याचे प्रमाण, वाढती गुन्हेगारी त्वरीत रोखण्यासाठी त्याच्या निषेधार्थ शनिवार 9 फेब्रुवारी रोजी सिंदखेडराजा येथे एक दिवसीय सर्वपक्षीय बंद करण्याचे ठरवले आहे. तर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपीला 12 तासाच्या आत अटक करुन तडीपार करावे अशा आशयाचे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस संचालक, पोलीस कमिश्नर, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे.

या घटनेच्या निषेध करण्यासाठी एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले. या घटनेसंदर्भात स्थानिक पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहामध्ये आज शुक्रवारी सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील गुन्हेगारी कशी कमी करता येईल यावर विचार करण्यात येवुन सर्वपक्षीय पदाधीकारी यांनी तहसिलदार संतोष कनसे यांना निवेदन दिले. या निवेदनात गेल्या काही दिवसापासून सिंदखेडराजा शहर व शहर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण अत्यंत दिर्घ स्वरुपात वाढले आहे. काल दिवसाढवळ्या शेख यासिन शेख नुरखॉ रा. सिंदखेडराजा यांचे घरावर तलवारीने हमला करुन दरोडा टाकण्यात आला. यापूर्वी मोटारसायकल चोरी, महिलांना बसस्थानकात लुटल्या जात आहे. शेतकर्‍यांच्या शेतावरील मोटारपंपाची चोरी, भरदिवसा घरावर दरोडे पडत आहेत. आरोपीला तात्काळ 12 तासाच्या आत अटक करावी व त्यांना तडीपार करावे. अन्यथा सिंदखेडराजा शहरवासीयांना तीव्र आंदोलन छेडावे लागेल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनांती उद्या 9 रोजी शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अ‍ॅड. नाझेर काझी, देविदास ठाकरे, जगन ठाकरेंसह असंख्य शहरावासियांच्या निवेदनावर सह्या आहेत.