आधी झोपू मग बघू! नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले

सामना ऑनलाईन। सिंगापूर

भरकार्यक्रमात एका महिलेला चुंबन दिल्याने टीकेचे धनी ठरलेले फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रोडीगो दुतेर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण यावेळी ही चर्चा त्यांच्या आचरटपणाबद्दल नसून त्यांच्या झोपाळू पणाची आहे. सिंगापूर येथे सुरू असलेल्या आसियान शिखर संमेलनात महत्वाच्या विषयांवर चर्चा सुरू होती. त्याचवेळी सभागृहात डुलक्या घेणारे दुतेर्ते अचानक उठले व थेट सभागृहाबाहेर पडले. त्यांचे हे वागणे तऱ्हेवाईक व आसियान शिखर संमेलनाच्या नियमाविरोधात होते. यामुळे अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. पण त्यांना झोप येत असल्याने त्यांनी सभा सोडली. असे स्पष्टीकरण राष्ट्रपती कार्यालयाने दिले आहे.

विशेष म्हणजे दुतेर्ते यांची झोप झाल्यानंतर त्यांना संमेलन मध्येच सोडून जाण्याचे कारण पत्रकारांनी विचारले असता. मेंदूला आराम देण्यासाठी डुलकी गरजेची होती आणि झोप काढण्यात काय वाईट आहे असा सवाल करत राष्ट्रपतींनी पत्रकारांच्या घोळक्यातून काढता पाय घेतला.