शीव ते वांद्रे… सीसीटीव्हीच्या आधारे टॅक्सी शोधली

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुलीचे साडेतीन लाखांचे दागिने, ५० हजारांचा मोबाईल आणि पाच हजारांची रोकड अशी टॅक्सीत विसरलेली बॅग केवळ सीसीटीव्हीच्या आधारे शोधून काढण्याची कौतुकास्पद कामगिरी शीव पोलिसांनी केली.

शीव येथील एअर फोर्स कॉलनीत जयवीर सिंह (४५) राहतात. शनिवारी सकाळी ते राजधानी एक्सप्रेसमधून वांद्रे टर्मिनसमध्ये उतरले. तेथून शीवला टॅक्सी करून आले. पण उतरताना साडेचार लाखांचा ऐवज असलेली बॅग ते टॅक्सीत विसरले. त्याची तक्रार त्यांनी शीव पोलीस ठाण्यात केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला लाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाटील व कॉन्स्टेबल दीपक जाधव यांनी टॅक्सीचा शोध सुरू केला. त्या मार्गावरचे सीसीटीव्ही तपासले. निर्मलनगर येथील फुटेजमध्ये ही टॅक्सी सापडली. टॅक्सीच्या नंबरवरून ऍण्टॉप हिल येथे राहणाऱया चालकाकडून बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली.