सेवाव्रती भगिनी निवेदिता

साहेबराव निगळ

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या आणि हिंदू धर्म व संस्कृतीचा जबरदस्त प्रभाव असलेल्या मार्गारेट एलिझाबेथ नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थानात स्वातंत्र्य चळवळीबरोबरच मोठय़ा प्रमाणावर शैक्षणिक आणि सामाजिक कार्य केले. ब्रिटिश राजवट कशी अन्यायकारक आहे हे त्या अत्यंत प्रभावीपणे सांगत. त्यामुळे अरविंद घोष त्यांना ‘अग्निशिखा’ म्हणत तर रवींद्रनाथ टागोर ‘लोकमाता’ म्हणत. शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी त्यांच्या १५०व्या जन्मदिनानिमित्त लंडन येथील त्यांच्या निवासस्थानी गौरव फलक लावण्यात येणार आहे. त्यानिमित्त हा लेख.

भगिनी निवेदिता यांच्या स्मरणार्थ त्यांच्या १५० व्या जन्मदिनी त्यांच्या लंडन येथील निवासस्थानी गौरव फलक लावण्यात येणार आहे. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा व हिंदुस्थानी स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करणारा फलक त्यांच्या घरावर लावण्यात येणार आहे. २८ ऑक्टोबर १८६७ या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबल. त्यांचे पिताश्री सॅम्युअल नोबल हे धर्मोपदेशक होते. ‘धर्म म्हणजे सेवा’ असा त्यांचा धर्मविषयक संदेश होता.

स्वामी विवेकानंदांनी सप्टेंबर १८९३ ची शिकागो येथील जागतिक धर्मपरिषद आपल्या ओजस्वी वाणीने गाजवली होती. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये व काही चर्चमध्येसुद्धा स्वामीजींची व्याख्याने झाली. १८९५ साली एका मित्राच्या आग्रहावरून ते लंडनला आले. लंडनलाही स्वामीजींची व्याख्याने झाली. मार्गारेट यांची मैत्रीण इसाबेल यांनी ही व्याख्याने ऐकून मार्गारेटलाही विवेकानंदांची व्याख्याने ऐकण्यासाठी प्रवृत्त केले. इसाबेलांनी स्वामीजींना आपल्या घरी आमंत्रित केले. तसेच तिने मार्गारेट नोबल यांनाही बोलावले. १५-१६ श्रोत्यांसमोर स्वामीजींनी एक छोटेसे व्याख्यान दिले. मार्गारेटच्या यांच्या तोंडून एक विधान उच्चारले गेले, ‘‘भाषण छान होते, पण त्यात काही नवीन नव्हते, असे मला वाटते.’’ घरी गेल्यानंतर मात्र श्रीमती मार्गारेट यांना आपल्या स्वामीजींच्या भाषणावरील शेऱयाचा पश्चात्ताप झाला. मध्यंतरी स्वामीजी अमेरिकेला परतले.

काही काळानंतर विवेकानंद पुन्हा लंडनला आले. त्यांची लंडनच्या विविध उपनगरांमध्ये ‘वेदांत भारतीय संस्कृती’ या विषयावर व्याख्याने झाली.  मार्गारेट यांनी ही सर्व व्याख्याने ऐकली. स्वामीजींच्या अभ्यासवर्गांनाही त्यांनी हजेरी लावली. स्वामीजींना त्यांनी अनेक प्रश्नही विचारले. त्यांच्याशी वादही घातले. विवेकानंदांची ओजस्वी वाणी, त्यांचे चारित्र्य व निःस्पृहता यांचा जबरदस्त प्रभाव श्रीमती मार्गारेट यांच्यावर  पडला. त्यांच्या आध्यात्मिक समस्यांची उत्तरंही मिळाली. स्वामीजी म्हणत, ‘‘जगाला त्यागी, सेवाभावी, वीरवृत्तीच्या तरुण-तरुणींची गरज आहे.’’ हे विचार ऐकून त्यांनी हिंदुस्थानात येण्याचा संकल्प स्वामीजींकडे व्यक्त केला.

साधारणतः एक वर्षानंतर २८ जानेवारी १८९८ रोजी मार्गारेट नोबल कलकत्ता शहरी पोहोचल्या. स्वामीजींशी त्यांचे पत्रव्यवहार चालूच होते. स्वामीजी त्यांना घेण्यासाठी बंदरावर आले होते. श्रीमती शारदामणी देवी यांचीही त्यांनी भेट घेतली. शारदामातेने तिला आपली कन्या म्हणूनच स्वीकारले. २५ मार्च १८९८ दिनी श्रीमती मार्गारेट नोबल यांना ब्रह्मचर्याची दीक्षा देण्यात आली व त्यांचे भगिनी निवेदिता असे नामकरण करण्यात आले. अशा प्रकारे त्या दैवी कार्यार्थ समर्पित झाल्या. उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचाही त्यांचा अभ्यास सुरू झाला. त्या हाडाच्या शिक्षिका होत्या. ध्यानधारणेबरोबर शिक्षण क्षेत्रात आपण काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागले. त्या नम्रपणे म्हणत “I have come to serve, not to uplift or teach.”

१३ नोव्हेंबर १८९८ रोजी भगिनी निवेदिता यांनी मुलींची शाळा   सुरू केली. दिवाळीचा दिवस होता. या शुभप्रसंगी स्वतः शारदामणी देवी, स्वामीजी व त्यांचे संन्यासी साथी उपस्थित होते. मार्च १८९९ महिन्यात प्लेगची साथ आली. स्वामीजींनी सेवाकार्य सुरू केले. या सेवाकार्याच्या प्रमुखपदी होत्या भगिनी निवेदिता. हातात झाडू घेऊन भारतभगिनींनी स्वतः शहरसफाईच्या कामात भाग घेतला. शैक्षणिक कार्यासाठी पैशांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. जून महिन्यात त्यांनी इंग्लंड व अमेरिकेचा दौरा केला. ‘दी प्रोजेक्ट ऑफ दी रामकृष्ण स्कूल फॉर गर्ल्स’ या नावाची पुस्तिका काढली. अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. आपले कार्य समजावून सांगितले. अशा कार्यक्रमांमधून फंड उभा केला. त्यांचे लिखाणही वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वामीजींनी त्यांना धीर देणारी पत्रे लिहिली. स्वामीजी सांगत ‘‘ध्येयपथावर वाटचाल करणे महत्त्वाचे होय. यश महत्त्वाचे नाही. निराश होऊ नकोस. ध्येयनिष्ठा सोडू नकोस.’’ १९०२ च्या फेब्रुवारी महिन्यात निवेदिताबाई हिंदुस्थानात परतल्या. ‘माझा देश, माझी मातृभूमी व माझे देशबांधव’ असे शब्दप्रयोग त्या हिंदुस्थानसाठी व हिंदुस्थानींसाठी वापरू लागल्या. घराघरात जाऊन पालकांना भेटून मुलींना शाळेत पाठविण्यासाठी त्यांना समजावू लागल्या. एकदा त्यांनी मुलींना प्रश्न विचारला, ‘‘हिंदुस्थानची राणी कोण आहे?’’ एका मुलीने ‘‘व्हिक्टोरिया’’ असे उत्तर दिले. हे उत्तर ऐकून निवेदिताबाईंना फार वाईट वाटले. त्यांनी स्पष्ट शब्दात सर्वांना बजावले, ‘नाही! सीता ही आपल्या देशाची राणी होय.’ ४ जुलै १९०२ रोजी  स्वामीजी निवर्तले. भगिनी निवेदिता खचल्या नाहीत. आपले कार्य पुढे नेण्याचा संकल्प अधिक दृढ केला. १९०३ पासून त्यांची शाळा रामकृष्ण शारदा मिशन सिस्टर निवेदिता गर्ल्स स्कूल म्हणून कार्यरत आहे.

१९०५ साली लॉर्ड कर्झन यांनी केलेल्या बंगालच्या फाळणीला भगिनी निवेदितांनी कसून विरोध केला. राष्ट्रकारणासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनचाही राजीनामा दिला. अनेक राष्ट्रीय नेते व क्रांतिकारकांशी त्यांचे जवळचे संबंध होते. बडोदा संस्थानात कार्यरत असलेल्या अरविंद घोषांनाही त्यांनी बंगालमध्ये बोलावून घेतले. हिंदुस्थानातील ब्रिटिश राजवट कशी अन्यायकारक आहे यासंदर्भातही त्यांनी प्रभावी भाषणे दिली. म्हणूनच अरविंद घोष त्यांना ‘अग्निशिखा’ म्हणत, तर रवींद्रनाथ टागोर त्यांना ‘लोकमाता’ म्हणत. डॉ. जगदीशचंद्र बोस व त्यांचे कुटुंब यांच्याशीही निवेदिताबाईंचा चांगला घरोबा होता. १३ ऑक्टोबर १९११ रोजी त्या दार्जिलिंग येथे कालवश झाल्या. हिंदुस्थानसाठी सर्वस्व समर्पित करणाऱया भारतभगिनी निवेदितांचे दार्जिलिंग येथेच स्मारक आहे.