पुण्यात बसून अमेरिकन नागरिकांना गंडविले


 

सामना प्रतिनिधी, पुणे
इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करून चक्क अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पूर्व भागात चालणारे हे बोगस कॉलसेंटर सायबर शाखेने उद्ध्वस्त केले असून, यामध्ये तिघांना अटक केली आहे. आतापर्यंत ११ हजार जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

शिवक प्रतिमदा लधानी (वय २९, रा. धानोरी), प्रतीक सुभाषचंद्र पांचाळ (वय ३०), शेरल सतीशभाई ठाकर (वय ३३, दोघे रा. रा. कोरेगाव पूर्व) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांकडून एक लॅपटॉप, आठ हार्ड डिस्क, तीन मोबाइल, आठ हेडफोन, कागदपत्रे जप्त केली आहेत.
कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रस्त्यावरील पिनॅकल बिल्डिंगमध्ये बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे, पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. तेथून या तिघांना ताब्यात घेतले.

झडतीमध्ये कॉम्पुटरच्या हार्डडिस्कमध्ये अमेरिकन नागरिकांची नावे, संपर्क क्रमांक, पत्ता व ई-मेल आयडी, यांसह इन्कम टॅक्स संदर्भातील माहिती होती. हे तिघे या नागरिकांना व्हाइस ई-मेल करीत, त्यानंतर फोन करून संपर्क साधत. आम्ही इन्कम टॅक्सचे अधिकारी आहोत, तुम्ही टॅक्स बुडवला आहे, यात सहा वर्षे शिक्षा होऊ शकते, अशी भीती दाखवत. कारवाई टाळण्यासाठी तडजोड शुल्क भरा, असे सांगत. त्यासाठी त्यांना आयट्यून, वॉलमार्ट, बेस्टबॉयचे गिफ्ट व्हाउचर खरेदी करायला सांगत. त्यावरील क्रमांक विचारून घेऊन ते गुजरातमध्ये पाठवत. तेथे ते पैसे हिंदुस्थानी चलनात बदलले जात होते. तर काहीजणांची कर्जाच्या बहाण्याने फसवणूक झाली आहे. आतापर्यंत या तिघांनी ११ हजार १२५ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे, सायबर शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले.