उपनिरीक्षकाला मारहाण करणाऱ्या सहा जणांना अटक

सामना प्रतिनिधी । मुंबई

पत्नीची छेड काढली म्हणून हटकले असता आठ जणांनी मिळून पोलीस उपनिरीक्षकास मारहाण केल्याची घटना केईएम रुग्णालयाबाहेर घडली होती. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. आणखी दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ते उपनिरीक्षक रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचा भाऊ केईएम रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याला बघण्यासाठी 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते अधिकारी पत्नीसमवेत गेले होते. त्यावेळी ते पाण्याची बाटली आणण्यासाठी रुग्णालयाबाहेरील एका दुकानात गेले असता तेथे उभ्या असलेल्या एकाने उपनिरीक्षकाच्या पत्नीकडे बघून अश्लील शेरेबाजी केली.

सुरुवातीला दोघांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र त्याइसमाची शेरेबाजी काही थांबली नाही. शिवाय त्या ठिकाणी दुसरी कोणी महिलादेखील नव्हती. त्यामुळे उपनिरीक्षला राग आल्याने त्यांनी त्या इसमाला हटकले. पोलीस असल्याची ओळख सांगून त्यांनी आपले ओळखपत्रदेखील त्याला दाखवले. मात्र अश्लील शेरेबाजी करणाऱ्या भामट्याने उलट हुल्लडबाजी करीत उपनिरीक्षकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या भामटय़ाचे काही सहकारी तेथे जमा झाले आणि सर्वांनी मिळून साध्या वेशात असलेल्या उपनिरीक्षकास मारहाण करण्यास सुरुवात केली. ते भामटे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी उपनिरीक्षकास एका टॅक्सीत कोंबून आतमध्ये मारहाण केली. उपनिरीक्षकाने आरडाओरड केल्यामुळे पादचाऱ्यांचे लक्ष वेधले गेले आणि उपनिरीक्षकाची सुटका झाली. त्यानंतर उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली, मात्र त्या सर्वांची नंतर जामिनावर सुटका झाली. या प्रकरणातील दोघेजण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.