दीड कोटींचे 25 टन तांबे लुटणाऱ्या 6 जणांना अटक

159

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

दुबई येथून जेएनपीटी मार्गे आयात केलेले स्टरलाईट टेक्नॉलॉजी लि. सिल्व्हासा कंपनीचे 25 टन वजनाचे आणि दीड कोटी किंमती कॉपर (तांबे) दरोडा टाकून लुटणाऱ्या उरण येथील सहा आरोपींना नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेने अटक केली आहे. या बाबत एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

दुबईहून आलेले हे तांबे जेएनपीटीच्या स्पीडी सिएफएस मध्ये उतरविण्यात आले होते. तेथून हा माल कंटेनरमध्ये स्टरलाईट कंपनीमध्ये पाठविण्यात येत होता. मात्र या कंटेनरच्या पाळतीवर असलेल्या या आरोपींनी कंटेनरचा पाठलाग करून गव्हाणफाटा ते बेलापूर रेतीबंदरच्या दरम्यान कार रस्त्यात आडवी टाकून थांबवला आणि चालकास मारहाण करून त्याच्या ताब्यातील कंटेनर ट्रेलर घेऊन त्यामधील किंमती कॉपर चोरून नेले. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस तपास करत असताना मध्यवर्ती गुन्हे शाखेचे एन.बी. कोल्हटकर यानी समांतर तपास करून आरोपी सागर विश्वनाथ म्हात्रे (41) रा. फुंडे, ता उरण, अमित अशोक म्हात्रे (32) रा. फुंडे, रूपेश गणपत म्हात्रे (34) रा. आवरे, प्रसाद पांडूरंग म्हात्रे (24) रा. पिरकोन, अरविंद हसुराम गावंड (35) रा.आवरे आणि चेतन किसन ठाकूर रा. चिर्ले-गावठाण यांना रविवारी अटक केली आहे. त्यांना 26 मे पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणातील सूत्रधार सागर विश्वनाथ म्हात्रे याच्यावर उरण पोलिस ठाण्यात चंदन चोरी चा गुन्हा दाखल आहे. तर इतर आरोपींवर विनयभंग, मारामारी सारखे गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी बऱ्याच दिवसांपासून अशाप्रकारचा गुन्हा करण्याचा बेत आखत होते. या परिसरातील गोदामांमध्ये ते रेकी करून कंटेनरमध्ये असणाऱ्या मालाची माहीती मिळवत असत आणि नंतर ते लुटत असत.

आपली प्रतिक्रिया द्या