रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेला सहा महिन्यांची मुदतवाढ

सामना ऑनलाईन, मुंबई

रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना होणाऱया मारहाणीच्या घटनांना अटकाव करण्यासाठी पालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांत नेमण्यात आलेल्या खासगी सुरक्षा व्यवस्थेला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या सुरक्षा व्यवस्थेचे एक वर्षाचे कंत्राट संपले असून नोव्हेंबर 2018पर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत या सुरक्षे व्यवस्थेसाठी पालिकेने 5 कोटी 71 लाख रुपये खर्च केले आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्यामुळे डॉक्टरांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन खूप चिघळल्यामुळे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. तेव्हा न्यायालयाने सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश दिले होते. पालिकेची स्वतःची सुरक्षा व्यवस्था असून त्यात आणखी खासगी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे. 29 मार्चपासून खासगी सुरक्षा रक्षक नायर, केईएम, सायन आणि कूपर रुग्णालयांत नियुक्त करण्यात आले होते. मार्चमध्ये त्यांचे कंत्राट संपले असून 31 ऑक्टोबरपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठवला आहे. पुढील सात महिन्यांसाठी या सुरक्षा रक्षकांच्या मानधनापोटी पालिकेला आणखी 5 कोटी 38 लाख खर्च करावे लागणार आहेत.

       रुग्णालय                रिक्त जागा       खासगी सुरक्षा रक्षक

  • केईएम रुग्णालय             31                    68
  • नायर                          28                    38
  • सायन रुग्णालय               20                    72
  • डॉ. आर. एन. कूपर         23                    23