गुजरातमध्ये गोडसे जयंती साजरी केल्याप्रकरणी हिंदु महासभेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक

11

सामना ऑनलाईन । सूरत

सूरतच्या लिंबायतमध्ये सोमवारी नथूराम गोडसेची जयंती साजरी केल्याप्रकरणी हिंदु महासभेच्या आठ जणांविरोधात गुन्हा गाखल करण्यात आला आहे. तर सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लिंबायतच्या हनुमान मंदिरात हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसेच्या जयंतीनिमित्त लाडू वाटले. तसेच 109 दिवेही लावून या उत्सवाचा व्हिडीओ काढला होता. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनंतर हेमंत सोनार, मनीष कलाल, वला मेर, हिरेन सुमरा, विरल मालवी आणि योगेश पटेल यांना अटक केली आहे.

या कार्यक्रमाला 15 जणांनी हजेरी लावली होती. स्थानिक वृत्तवाहिनीला या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यास विनंती आयोजकांनी केली होती. त्यानुसार या वृत्तवाहिन्याच्या प्रतिनिधीने या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले आणि त्याचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असे पोलिसांनी सांगितले. तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

तर आपण काहीच चुकीचे केले नाही असे स्पष्टीकरण आयोजक हीरेन सुमरा यांनी दिले आहे. तसेच जसे लोकांना महात्मा गांधीबद्द्ल आपुलकी वाटते तसेच आम्हाला नथुराम गोडसे बद्दल वाटते असेही सुमरा यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या