‘म्हाडा’चे घर देतो सांगून फसवणूक करणाऱ्या सहाजणांवर गुन्हा

1

सामना ऑनलाईन, मुंबई

दादरच्या खेडगल्लीत म्हाडाची रूम मिळवून देतो अशी बतावणी करून तसेच म्हाडाची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून एका तरुणाची सहाजणांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी पैसे परत मागतो म्हणून सदर तरुणाला  ठार मारण्याची धमकीदेखील दिली. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात सहाजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

एल्फिन्स्टन येथील बीएमसी टेनामेंट येथे राहणारा आशीष पाटील (33) याची फसवणूक झाली आहे. 2016 मध्ये खेडगल्ली येथे 340 चौरस फुटांची म्हाडाची रूम मिळवून देऊ असे आरोपींनी सांगितले होते. त्यांनी मला म्हाडाची बनावट कागदपत्रे तयार करून दिली. तसेच एल्फिन्स्टन येथील प्रार्थना हॉटेलमध्ये आम्ही पुन्हा भेटलो होतो. तेव्हा ठरलेल्या व्यवहारानुसार आर. टी. जी. एस. व्यवहारामार्फत व रोकड स्वरूपात 31 लाख आतापर्यंत घेतले, पण अजूनही म्हाडाची खोली दिली नाही. 21 लाख परत दिले, पण उर्वरित 10 लाखांची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन ठार मारण्याची धमकी देत असल्याचे आशीषने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी रवींद्र साटम, राजन भोसले, देवा जोशी, संदीप लाड, गणेश जगताप, मोहम्मद हमीद इस्माईल या सहाजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. भोसले हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. गुह्याचा अधिक तपास सुरू असल्याचे दादर पोलिसांनी सांगितले.