घोड्यावरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू

सामना ऑनलाईन ।  मुंबई

गिरगावमध्ये राहणाऱ्या एका ६ वर्षांच्या चिमुरडीवर आज काळाने घाला घातला. कुटुंबीयांसोबत मौजमजा करण्यासाठी गेलेली जान्हवी शर्मा ही चिमुरडी घोड्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ मुंबई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तेथेच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी घोडाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जान्हवी ही गिरगावच्या झावबावाडीत राहत होती. रविवारची सुट्टी असल्याने पालकांसोबत ती मरीन ड्राइव्ह येथील कुपरेज मैदानालगत असलेल्या गार्डनमध्ये गेली होती. त्या गार्डनमध्ये गेल्या २५ ते ३० वर्षांपासून घोडेस्वारीचा व्यवसाय सुरू आहे. आज दुपारी चारच्या सुमारास जान्हवी घोडेस्वारी करीत होती, मात्र अचानक ती घोड्यावरून खाली पडली. यात तिच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिला तत्काळ मुंबई रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी घोडेचालक सोहम छोटू जयस्वाल (३०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.