शेतकऱ्यांवर नवं संकट, साठवलेल्या कापसामुळे होत आहेत त्वचा रोग

प्रसाद नायगावकर । यवतमाळ

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ट संपता संपत नाही आहे. गारपिट, कर्जाचा बोजा यामुळे त्रस्त असलेल्या यवतमाळमधील कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना कापसाची गंजी घरात साठवल्यामुळे त्वचारोग होत असल्याचे दिसून येत आहे. कापसाचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना त्वचारोग होऊ लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबीय चिंतातुर झाले आहेत.

कापसाचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना आधी बोंडअळीचा सामना करावा लागला. त्यातून उरलेला कापूस भविष्यात भाव वाढतील या आशेने काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवला होता. पण हाच कापूस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे . कापसातील किडे व अळ्यांमुळे शेतकऱ्यांना त्वचारोगाचा प्रादुर्भाव होत आहे. या रोगाची लागण झालेल्या व्यक्तींच्या अंगावर लाल चट्टे उठत आहेत. उन्हाची काहिली वाढत असताना हा त्वचारोग शेतकऱ्यांना अधिक त्रासदायक ठरू लागला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी या आजारांवर घरघुती उपचार न घेता सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार करुन घेण्याचे आवाहन यवतमाळ जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर डी जी जाधव यांनी केले आहे. तसेच शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी त्वचारोगाचा विषय गंभीर असून तो शासन दरबारी मांडणार असल्याचे सांगितले आहे.