हवामान खात्याचे अंदाज चुकले, स्कायमेटची टीका

सामना ऑनलाईन, मुंबई

हवामान खात्याच्या चुकणाऱ्या अंदाजांवर आता उघडपणे नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. आता तर स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने आकड्यांनिशी हवामान खात्याचा अंदाज कसा चुकला ते सांगितलं आहे. स्कायमेटचे मुख्य हवामानतज्ज्ञ महेश पलावत यांनी म्हटलंय की हवामान खात्याने पावसाचा वर्तवलेला अंदाज ३ टक्क्यांनी चुकला आहे.

पलावत यांनी एका वृत्तवाहिनीला फोवनरून दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की सरकारी हवामान खात्याने देशामध्ये ९८ टक्के पाऊस पडेल असा अंतिम अंदाज वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात ९५ टक्के पाऊस झाला आहे. स्कायमेटने दावा केला आहे की त्यांनी अचूक आकडा वर्तवला होता म्हणजेच ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता.

जुलै, ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्याने आनंदाचं वातावरण होतं, या पावसामुळे देशात १०६ टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल अशी आशा निर्माण झाली होती, मात्र नंतर पावसाने ओढ दिल्याने पावसाची टक्केवारी ९५ टक्क्यांपर्यंत मर्यादीत राहीली. हिंदुस्थानात २१५ जिल्हे असे आहेत, जिथे पावसाचं प्रमाण नगण्य राहीलं आहे, या जिल्ह्यांमध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे.