नगरसेवक काका झोपले का? आयुक्त काका गार्डन द्या! चिमुकल्यांचा मोर्चा

सामना प्रतिनिधी । सांगली

सांगली येथील हनुमाननगरमध्ये ऑक्सिडेशन प्लॉटच्या दहा ते बारा एकर जागेमध्ये उद्यान विकसित करण्यासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या उद्यानासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली असताना ऐनवेळी या उद्यानाचा निधी अन्यत्र वळवून उद्यान पळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच्या निषेधार्थ परिसरातील शालेय विद्यार्थी, लहान मुले यांनी आज महापालिकेवर अभिनव मोर्चा काढून मंजूर उद्यान तातडीने सुरू करा, अशी मागणी केली. या अभिनव आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांनी केले.

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत महापालिकेचा समावेश हरितक्षेत्र विकास प्रकल्पात करण्यात आला होता. त्यातून शहरातील नव्याने आठ उद्याने विकसित होणार असून, एका उद्यानाचे सुशोभीकरण होणार आहे. त्यानुसार सांगली-मिरज- कुपवाड महापालिका क्षेत्रात नव्याने आठ उद्याने विकसित करण्यासाठी केंद्र शासानाने साडेचार कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये सन २०१६-१७च्या योजनेतून मिरज येथील रमा उद्यान सुशोभीकरण करणे व सांगली येथील शिवोदयनगर तसेच संजयनगर येथील असलेल्या खुल्या भूखंडावर उद्यान विकसित करण्यासाठी १ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. सन २०१७-१८ च्या योजनेतून सहा उद्याने नव्याने करण्यास मंजुरी दिली आहे. त्याला अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील काळ्या खाणीजवळ असलेल्या अडीच ते बारा एकर जागेमध्ये उद्यान विकसित करण्यासाठी ३८ लाख ६४ हजार, हनुमाननगर येथील ऑक्सिडेशन प्लॉटच्या दहा ते बारा एकर जागेमध्ये उद्यान विकसित करण्यासाठी २ कोटी, वसंतदादा साखर कारखाना येथील १ एकर जागेमध्ये नवीन उद्याने विकसित करण्यासाठी ३० लाख ९३ हजार, संजयनगर येथील भाग्योदय हौसिंग सोसायटी येथे ३० गुंठे जागेवर उद्यान विकसित करण्यासाठी २४ लाख ६९ हजार, कुपवाड येथील एसटी कॉलनीमध्ये उद्यान विकसित करण्यासाठी ३२ लाख व चंद्रप्रभू हौसिंग सोसायटीच्या खुल्या जागेत उद्यान विकसित करण्यासाठी ३२ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

मात्र, हनुमाननगरमधील विकसित करण्यात येणारे उद्यान महापालिकेच्या पदाधिकाऱयांनी पळवून नेले आहे. उद्यान मंजूर असतानाही हे उद्यान दुसरीकडे करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. या संतापापोटीच आज महापालिकेवर अभिनव मोर्चा काढण्यात आला. प्राणी-पक्ष्यांचे वेश परिधान करून लहान मुलांनी महापालिकेच्या दारात ठिय्या मारला. ‘आमच्या हक्काचे उद्यान आम्हाला द्या’ अशी आर्त हाक हे विद्यार्थी देत होते. आंदोलकांच्या वतीने यावेळी महापालिका उपायुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात लहान मुलांबरोबर अनेक नागरिकही सहभागी झाले होते.