स्मार्टफोनच्या स्फोटात सीईओचा मृत्यू, चार्जिंगला लावला होता फोन

सामना ऑनलाईन । मलेशिया

हल्ली चार्जिंगला लावलेल्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना मलेशियात घडली असून यात क्रॅडल फंड या कंपनीचे सीईओ नाजरीन हसन यांचा मृत्यू झाला आहे.

नाजरीन यांनी रात्री दोन स्मार्टफोन चार्जिंगला लावले होते. त्यातील एकाचा स्फोट झाला आहे. स्मार्टफोन अतिगरम झाल्यामुळेच त्याचा स्फोट झाला असे पोलिसांनी सांगितले आहे.

क्रॅडल फंड मलेशियातील अर्थमंत्रालयाशी संबंधित कंपनी असून टेक स्टार्टअप्सला मदत करते. नाजरीन त्या कंपनीचे सीईओ म्हणून काम करत होते. ते ब्लॅकबेरी व हुआवेचे स्मार्टफोन वापरत होते. रात्री झोपण्याआधी त्यांनी दोन्ही स्मार्टफोन चार्जिंगला लावले होते. अचानक त्यातील एकाचा स्फोट झाला. बघता बघता आगीचा भडका उडाला व आग बेडपर्यंत पोहोचली आणि गादीने पेट घेतला. यामुळे बेडरुममध्ये मोठ्याप्रमाणावर धूर जमा झाला. यात गुदमरून नाजरीन यांचा मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले आहे.

पण नाजरीन यांच्या कुटुंबाने सोशल साईटवर एक पोस्ट टाकली आहे. यात स्फोटामुळे मोबाईल फुटला व त्याचा एक अणुकुचीदार तुकडा नाजरीन यांच्या डोक्यात घुसला. यात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. कुटुंबातील मंडळी जोपर्यंत नाजरीन यांच्या बेडरुमपर्यंत पोहोचली तेव्हा फार उशीर झाला होता. नाजरीन यांचा मृत्यू झाला होता.

काही दिवसांपासून स्मार्टफोन फुटण्याच्या घटना सातत्याने गडत आहेत. मुंबईत एका व्यक्तीच्या खिशातील मोबाईलचा असाच अचानक स्फोट झाला होता. तर अमेरिकेत एक महिला कार चालवत असताना तिच्याजवळील स्मार्टफोनचा स्फोट झाला यात महिला जखमी झाली तर तिची कार जळून खाक झाली होती.