लेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली!’

>> वैश्विक 

नासा’ने अवकाशात सोडलेला माणसाचा ‘तिसरा डोळा’ म्हणजे हबल टेलिस्कोप. गेली पंचवीस वर्षे ही अवकाश दुर्बिण दूरस्थ ताऱ्यांचे आणि त्याभोवती (काही ठिकाणी) असलेल्या ग्रहमालांचे हजारो फोटो पाठवत आहे. अगदी अलीकडेच ‘हबल’ने घेतलेला एक फोटो प्रसिद्ध झाला तो आहे अवकाशस्थ ‘स्माईली’चा. या प्रकारची अभिव्यक्तीची चित्रं सध्या सायबर विश्वात ‘इमोजी’ म्हणून ओळखली जातात. शब्दांऐवजी या इमोजीद्वारे ‘संदेश’ दिला जातो. तर त्यातील मजेचं चित्र ‘स्माईली’. ते सर्वांनाच ठाऊक आहे.

हबल स्पेस टेलिस्कोपच्या ‘नजरेत’ जो स्माईली आला तो दीर्घिका गुच्छ (गॅलॅक्सी क्लस्टर) सीडीएसएस जेओ 952 अशा तांत्रिक नावाच्या दीर्घिका समूहात सापडला आहे. दोन डोळय़ांच्या जागी दोन दीर्घिका आणि त्याखाली स्मितहास्य दाखवणारा एका दीर्घिकेचा चंद्रकोरीसारखा ‘ताणलेला’ आकार यातून हा अवकाशस्थ स्माईली साकारला आहे. एका दीर्घिकेचं ताणल्यासारखं दिसणं हा ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग किंवा ‘गुरुत्वीय भिंगा’चा परिणाम आहे. प्रचंड वस्तुमानाच्या अवकाशस्थ वस्तूमुळे  प्रकाशाचं वक्रीभवन होतं. त्यातून असा प्रकार घडतो.

काही वेळा आपल्या ग्रहमालेतले दोन ग्रह आणि त्याखाली बीजेची बारीक चंद्रकोर असाही ‘स्माईली’ दिसतो. ही सगळी अवकाशी आकारांची गंमत खगोलशास्त्राचा अभ्यास करायला मात्र उपयोगी ठरते. अवकाशातील तारकासमूहांचे आकार राशी किंवा नक्षत्र यांच्या रूपाने शतकानुशतकं ज्ञात आहेत. यापैकी काही आकार ओढून-ताणून बसल्यासारखे वाटतात तर काही अगदी चपखल बसतात. राशींचा विचार केला तर ‘वृश्चिक’ राशीचा आकार खरोखर विंचवाच्या नांगीसारखा दिसतो. अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ ही तीन नक्षत्रं या राशीत येतात. अनुराधा नक्षत्राचे तीन सरळ रेषेतील तारे, त्याच्या थोडं खाली ज्येष्ठाचा तेजस्वी लाल तारा (जो कधीही अतिनवतारा किंवा सुपरनोव्हा होऊ शकतो) आणि विंचवाच्या शेपटीत मूळ नक्षत्राचे दोन तारे असा ‘वृश्चिक’ आकार सुंदर दिसतो. तारकासमूहांची या काल्पनिक, परंतु आपल्याला ठाऊक असणाऱ्या आकारांशी सांगड घातली की, ते लक्षात ठेवणं सोपं जातं. शिवाय रात्रीच्या आकाशात या राशी, नक्षत्रं, चटकन ओळखता येतात. एकदा त्यांची ओळख ‘पक्की’ झाली की, त्यावरून आसपासच्या ताऱयांचा आणि दीर्घिका, तारकागुच्छ इत्यादी अवकाशस्थ वस्तूंचा ‘पत्ता’ लगेच समजतो.

महत्त्वाच्या तारकासमूहांचे आकार लक्षात ठेवून त्यांच्या संदर्भाने आसपासचे तारे सहजपणे ओळखता येतात. एखाद्या नव्या गावात गेल्यावर पत्ता शोधताना आपण जवळच्या एखाद्या प्रसिद्ध इमारतीची किंवा दुकानाची माहिती देऊन अमक्या तमक्या गोष्टीजवळ असं संगतो तसंच हे अवकाशस्थ आकारांचं स्वरूप आहे. आकाशदर्शन करताना उत्तरेचा अढळ ध्रुवतारा जसा महत्त्वाचा तसाच शर्मिष्ठा किंवा ‘कॅसिओपिआ’ हा तारकासमूह अथवा अर्सा मेजर म्हणजे सप्तर्षी तारकासमूह महत्त्वाचा. या दोन्हींपैकी एक मावळतीच्या वेळी आकाशात असतोच. त्यावरून धुवतारा शोधता येतो. मात्र त्यासाठी आधी शर्मिष्ठा आणि सप्तर्षी ओळखण्याचा सराव करायला हवा. हे आकार ताऱयांचे असल्याने अगदी सहज लक्षात राहतात. सर्वांना ठाऊक असलेल्या ‘मृग’ नक्षत्राचं उदाहरण घेऊ. नक्षत्र मालिकेतलं हे पाचवं नक्षत्र अतिशय विलोभनीय असून हिंदुस्थानी खगोलविदांनी त्यात बाणाने घायाळ झालेलं हरीण म्हणजे ‘मृग’ पाहिलं. हे ‘उडतं’ हरीण, त्याला ‘लागलेला’ तीन ताऱयांचा बाण, हरणाचं डोकं (मृगशीर्ष) आणि त्याची शिकार करणारा व्याध तारा सारं दाखवता येतं. या नक्षत्राद्वारे खगोलशास्त्रातील बऱ्याच गोष्टी कळतात. त्यातील काक्षी (बीटलग्युज) तारा हा मरणपंथाला लागलेला ‘लाल राक्षसी तारा’ आहे, तर या मृगाच्या अंधूक शेपटात हजारो तारे जन्माला घालणारा मृगाचा ‘तेजामेघ’ ही आहे!

याच आकाराला ग्रीकांनी ‘ओरायन’ नावाच्या शिकाऱ्याचं स्वरूप दिलं. त्यांनी मृगशीर्षाला शिकाऱ्याचा चेहरा मानून गुडघ्यावर बसून शिकार करणारा शिकारी ‘चितारला’. आपण त्याला ‘बाण’ म्हणतो त्याला ते शिकाऱ्याचा कमरपट्टा समजतात आणि आपला ‘व्याध’ तारा त्यांच्या शिकाऱ्याच्या श्वानाच्या कंठातला बिल्ला ठरतो. शेवटी हे सारे काल्पनिक आकार, विविध तारकासमूहांची ओळख स्पष्ट करण्यासाठी असतात. आता पावसाळा संपलाय. रात्रीच्या निरभ्र आणि काळोख्या (कृष्ण पक्षातील) आकाशात हजारो तारे चमचमताना दिसतील. त्यापैकी काही ‘आकार’ थोड्याशा निरीक्षणातून लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर त्यात किती आनंद आहे हे आकादर्शनाचा अनुभव घेतल्याशिवाय समजणं कठीण. विराट विश्व दोन डोळय़ांत साठवण्याचा मोसम सुरू झालाय. शक्य झालं तर दुर्बिणीद्वारे किंवा नुसत्या डोळय़ांनी तरी ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ न्याहाळायला हरकत नाही. कारण आपण पृथ्वीवासी याच अवकाशी पसाऱ्यातला एक भाग आहोत. आकाशदर्शनाचा छंद जडला तर आपल्या चेहऱ्यावर मात्र ‘स्माईली’ जरूर उमटेल!

[email protected]