आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत ‘एसएमआरके’चे यश

सामना प्रतिनिधी, नाशिक

एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एस.एन.डी.टी. विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली. चार विद्यार्थिनींची राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या. बास्केटबॉल स्पर्धेत एस.एम.आर.के. महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. जसलीन कौर गोडाख या विद्यार्थिनीला ‘प्रॉमिसिंग प्लेयर ऑफ बास्केटबॉल’ हे पारितोषिक मिळाले आहे. ज्युडो स्पर्धेत एस.एम.आर.के. संघाने विजेतेपद प्राप्त केले. महाविद्यालयाने एकूण ४ सुवर्ण व १ रौप्य पदक मिळविले. शिवानी थत्तेकर हिला सर्वोत्कृष्ट खेळाडू व विद्यावती इंगळे हिला ‘प्रॉमिसिंग प्लेयर ऑफ ज्युडो’ हे पारितोषिक मिळाले.

पूजा शार्दुल, जया इंगळे, शिवानी थत्तेकर, विद्यावती इंगळे या खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना महाविद्यालयाच्या क्रीडा प्रशिक्षक कविता खोलगाडे यांचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्या दीप्ती देशपांडे, उपप्राचार्या मोहिनी पेटकर, साधना देशमुख, कविता पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.