महिला सक्षमीकरणाची पंचसूत्री

>> स्नेहा अजित चव्हाण<<

स्त्रीयांच्या सबलीकरणासाठी खालील पंचसूत्री प्रत्येक महिलेने अवलंबिणे क्रमप्राप्त आहे – सुशिक्षित स्त्रीयांवर होणाऱ्या सर्व अत्याचारांचे मुख्य कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव! संपूर्ण मानवजातीच्या विकासासाठी मुलींच्या शिक्षणाइतके परिणामकारक दुसरे साधन नाही. शिक्षण हे स्त्रीयांना आर्थिक आणि मानसिक सामर्थ्य देते. शिक्षण घेतल्यामुळे स्त्रीयांची निर्णयक्षमता वाढते. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावण्याकरिता व समाजाची वीण घट्ट करण्याकरिता सुशिक्षित स्त्र्ााrचा हातभार लागतो. कमी वेळात व कमी खर्चात राष्ट्र शिक्षित करण्याचा हा खात्रीलायक उपाय आहे. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. सुसंस्कृत : स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘संपत्तीचा ऱ्हास झाला तर फारसे कचरण्याचे कारण नाही. प्रकृतीचा ऱ्हास झाला तर तो चिंतेचा भाग आहे. मात्र चारित्र्याचा ऱ्हास झाला तर तो सर्वनाश ठरेल.’’ संस्कृती व मूल्ये यांचे अतूट नाते  आहे. संस्कृतीतून मूल्ये जन्म घेतात, मूल्यांमधून संस्कृती समृद्ध होते. नीतिमूल्यांचा महावटवृक्ष हा संस्कृतीतच ताठ उभा राहतो. यामध्ये घरातल्या आईची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून ती सुशिक्षित, सुसंस्कृत, सुविद्य, सत्शील, सद्गुणी असलीच पाहिजे. त्यासाठी मातेने व त्याचबरोबर घरातील प्रत्येकाने सजग राहावयास हवे. सकस आहार : ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ असे समर्थांनी म्हटले आहे. जर शरीर स्वस्थ तर मन प्रसन्न. घरातील इतर सदस्यांची त्यांच्या खाण्यापिण्याची आपण जेवढी काळजी घेतो तेवढीच आपल्या तब्येतीची काळजी घेणे पण गरजेचे आहे. सुदृढ शरीर हीच खरी धनदौलत! आहारामुळे भावनिक विकासही साधला जातो. म्हणून आहार हा केवळ आहार शारीरिक गरज न समजता संस्कारित पूर्णब्रह्मच मानले पाहिजे. स्वयंसंरक्षण – महाभारतामध्ये कृष्ण द्रौपदीच्या मदतीला धावून आला, पण आजच्या कलियुगात कोणताही कृष्ण आपल्या मदतीला धावून येणार नाही. आईच्या पदराला किंवा मुलीच्या ओढणीला जर कोणी हात घातला तर तो हात मुळापासून उपटून टाकण्याची ताकद आपल्या मनगटात असली पाहिजे. जेवढे घरातले जेवण आपण कुशलतेने करतो व सुगरण असल्याचा मान पटकावतो, त्याचप्रमाणे प्रसंगी अन्यायाच्या, अत्याचाराच्या विरुद्ध, घरगुती हिंसेच्या विरुद्ध उभे राहण्याची, प्रतिकार करण्याची ताकद स्त्रीयांच्या मनगटात असली पाहिजे. म्हणून शारीरिक पातळीवरसुद्धा स्त्रीयांनी कणखर व खंबीर बनले पाहिजे. यासाठी सर्व महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे अत्यावश्यक आहे. सुसंगत : जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्यांनी त्याची पाने फाटतात. याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. याउलट दुर्योधनाच्या सहवासाने कर्ण श्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला. आजच्या जगातील प्रत्येक महिलेने वरील पंचसूत्री आपल्या जीवनात उतरवली तर खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण पूर्णत्वाला जाईल.