स्पायडरमॅन : ‘सोशल’ निरपराधी तुरुंगात

सोशल मीडियाच्या गैरवापरावर बंधने ही हवीतच आणि सोशल मीडियाच्या गैरवापराला कायद्याचा धाकदेखील हवाच. मात्र सायबर क्राइम किंवा सोशल मीडियासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करताना  दक्षता बाळगायला हवी. अर्थात तपास यंत्रणेलाच बहुदा कायद्याचे अपुरे ज्ञान, फेसबुक, व्हॉटस्ऍप नक्की कोणत्या तंत्रज्ञानावर आणि कसे चालते या ज्ञानाचा अभाव असावा. कदाचित यामुळेच एका निरपराध्याला सध्या देशद्रोही म्हणून तुरुंगात खस्ता खाव्या लागत आहेत. मध्य प्रदेशातील राजगढ जिह्यातील ही विदारक सत्यकथा आहे. राजगढच्या तालेन कसब्यातील जुनैद खान हा खरेतर बीएस्सी शाखेचा विद्यार्थी. हा युवक गेली पाच महिने तुरुंगात बंद आहे ते ही व्हॉटस्ऍपवर फॉरवर्ड करण्यात आलेल्या एका अनुचित मेसेजच्या संदर्भात. महत्त्वाचे म्हणजे हा मेसेज जुनैदने पाठवलाही नव्हता आणि ज्या ग्रुपमध्ये हा मेसेज पाठवण्यात आला त्या ग्रुपचा तो ऍडमिनदेखील नव्हता. तो होता फक्त सदस्य. जुनैदला १४ फेब्रुवारी २०१८ ला या अनुचित व्हॉटस्ऍप मेसेजच्या प्रकरणात ग्रुप ऍडमिन म्हणून अटक करण्यात आली आहे. घडले असे होते की, जेव्हा असे काही मेसेज ग्रुपमध्ये फॉरवर्ड झाले तेव्हा ग्रुपचा मूळ ऍडमिन इरफान याने तत्काळ ग्रुप सोडला. व्हॉटस्ऍप ज्या तंत्रज्ञानाच्या आधारे कार्य करते त्या तंत्रज्ञानाने मूळ ऍडमिनने ग्रुप सोडताच आपोआप नवीन ऍडमिन म्हणून जुनैदला निवडले आणि त्याला ऍडमिनपदी बसवले. जेव्हा स्थानिकांनी केलेल्या तक्रारीवरून तपास सुरू झाला तेव्हा ग्रुपचा ऍडमिन बनला होता जुनैद, ज्याला पोलिसांनी गुन्हेगार समजत ताब्यात घेतले. जुनैदवरती देशद्रोहाचे कलम लावलेले असल्याने त्याला आता जामीन मिळणेदेखील अशक्य आहे. कोर्टात त्याच्यावर ‘देशद्रोही’ म्हणूनच खटला चालवला जाणार आहे. स्थानिक नागरिक मात्र ठामपणे जुनैदची बाजू घेत असून आपण जुनैद नाही तर ग्रुपचा मूळ ऍडमिन इरफानच्या नावाने तक्रार दिल्याचे सांगत आहेत. पोलीस मात्र कारवाईच्या वेळी जुनैद हाच ग्रुप ऍडमिन दिसत असल्याने आपण केलेल्या कारवाईवर ठाम आहेत.