आलोक वर्मा भ्रष्ट मग होमगार्ड, अग्निशमन सेवेचे महासंचालक का बनवले?


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची गुरुवारी हकालपट्टी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीने 2-1 असा मतांनी आलोक वर्मा यांना हटवण्याचा निर्णय घेतला. या समितीत पंतप्रधान मोदी, काँग्रेस नेते मल्लीकार्जुन खरगे आणि न्यायमुर्ती ए.के. सीकरी यांचा समावेश होता. आलोक वर्मा यांनी सीबीआय संचालक पदावरून हटवल्यानंतर त्यांना होमगार्ड, अग्निशमन सेवेचे महासंचालक बनवले. सीबीआय संचालक अतिरिक्त जबाबदारी नागेश्वर राव यांच्याकडे देण्यात आली आहे.

आलोक वर्मा यांनी पदावरून हटवल्यानंतर काँग्रेसने तातडीने पत्रकार परिषद घेत मोदींची हुकुमशाही असल्याचा आरोप केला. तसेच राफेल प्रकरणाच्या चौकशीला घाबरून मोदींनी आलोक वर्मा यांनी हटवल्याची टीका केली. विरोधी पक्षांसह सोशल मीडियावरही आलोक वर्मा यांना हटवल्याचा मुद्दा गाजला. आलोक वर्मा भ्रष्ट असल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली तर मग त्यांच्यावर होमगार्ड, अग्निशमन सेवेचे महासंचालकपदाची जबाबदारी का सोपवली असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित होत आहे.

भ्रष्टाचारामुळे एका पदावर राहण्याचा अधिकार नसेल तर दुसऱ्या पदावर कसेकाय त्यांची नियुक्ती होऊ शकते. तिथे भ्रष्ट अधिकारी कसा चालेल? असा सवाल एका युझरने केला आहे. तसेच पाच दिवसांपूर्वी एखादा व्यक्ती सीबीआयच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम असतो परंतु पाच दिवसानंतर भ्रष्टाचाराचा आरोप होऊन पायउतार कसा होऊ शकतो? असाही सवाल काहींनी उपस्थित केला आहे.