समाजसुधारक संत

>> दिलीप जोशी ([email protected])

‘देवकीनंदन गोपाळा’ असं भजनाचं सूत्र घेऊन कीर्तनाच्या माध्यमातून गाडगेबाबांनी सुमारे पन्नास वर्षे महाराष्ट्रात जनजागृती केली. समाजसुधारक संत म्हणून त्यांचं अद्वितीय स्थान त्यांच्या समकालीन दिग्गजांनीही मान्य केलं. ‘जनी जनार्दन, संत बोलती वचन’ असं कीर्तनातून सांगत त्यांनी लोकसेवेचं महत्त्व सर्वांना पटवून दिलं. डोक्यावर खापर, चिंध्यांचा स्वत: शिवलेला अंगरखा आणि हाती खराटा अशा वेशातील गाडगेबाबांची मूर्ती अवघ्या महाराष्ट्राला परिचित होती. १८७६ ते १९५६ असा त्यांचा जीवनकाळ. तरुण वयातच घर-संसार सोडून ते लोकोद्धारासाठी निघाले आणि समाजशिक्षणाचं अपूर्व कार्य त्यांनी केलं. त्यांची साठावी पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांचं स्फूर्तिदायी स्मरण.

अत्यंत गरिबी पाहिलेल्या, सावकारी पाश अनुभवलेल्या डेबूजी नावाच्या मुलाच्या मनावर परिस्थितीनेच संस्कार घडवले. रूढार्थाने कोणतंही शिक्षण न घेता त्यांनी आत्मसात केलेलं ज्ञान खरोखरच चकित करणारं होतं. हे ज्ञान म्हणजे जीवनविषयक तत्त्वज्ञानच होतं. आचार्य अत्रे यांच्यासारख्या भाषाप्रभूलाही गाडगेबाबांच्या कीर्तनाने विस्मयचकित केलं. गाडगेबाबांचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय की, ‘सिंहाला पहावं वनात, हत्तीला पाहावं रानात, तसं गाडगेबाबांना पाहावं कीर्तनात!’ बाबांच्या ओघवत्या कीर्तनशैलीने आणि सुस्पष्ट विचारसरणीने प्रभावित झालेल्या आचार्य अत्रे यांनी असंही म्हटलं की, ‘आजवरचा आमच्या आयुष्याचा काळ बाबांची अमोघ वाणी ऐकून सार्थकी लागला.’

ज्या गावात गाडगेबाबा कीर्तनासाठी जात, तिथे आधी ते हाती खराटा घेऊन स्वच्छतेचा धडा घालून देत. मुंबईत समतानंद अनंत हरी गद्रे यांच्याकडे ते गिरगावातील गोरेगावकर चाळीत आले तेव्हा तिथेही त्यांनी परिसर झाडून स्वच्छ केला. त्यावेळचे छायाचित्र या लेखासोबत आहे. अत्रे यांच्या खंडाळा येथील बंगल्याचा परिसर त्यांनी असाच स्वच्छ केला तेव्हा अत्रे भारावून गेले होते.

सत्यशोधकी विचारांचे अग्रणी समर्थक प्रबोधनकार ठाकरे यांनी गाडगेबाबांच्या हयातीतच त्यांचं चरित्र लिहिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याविषयी गाडगेबाबांना आदर होता. आपल्या कीर्तनातून ते त्यांचा उल्लेख करत असत.

माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे एवढं साधंसोपं त्यांच्या विचारांचं सार होतं. समाजातल्या अनिष्ट रूढीवादावर प्रहार करत त्यांनी त्यांच्या जीवनात आपोआपच विज्ञानवाद जोपासला. गाडगेबाबांचं कीर्तन म्हणजे श्रोत्यांशी संवाद असायचा. तोसुद्धा बराचसा वर्‍हाडी भाषेत. त्यांचे स्वच्छ विचार ऐकण्यासाठी श्रोते जीवाचे कान करून बसत. त्यांचं कीर्तन अनुभवलेल्या काही लोकांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा कळलं की, कोणतीही जाहिरात नसताना गाडगेबाबांच्या कीर्तनाला हजारो लोक उपस्थित राहत.

माईकची सोय नसूनही खणखणीत आवाजातलं बाबांचं कीर्तन श्रोत्यांचं प्रबोधन करत असे. अनेकांच्या मनातली वैचारिक जळमटं आणि किल्मिषं नष्ट करण्याची ताकद त्यांच्या शब्दांत होती. याच माध्यमातून लोकसंग्रह करत त्यांनी अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. त्यासाठी ट्रस्ट स्थापन केला. परंतु त्यामध्ये त्यांनी स्वत:चा कोणताच अधिकार ठेवला नाही. अत्यंत अलिप्तपणे, अपरिग्रह वृत्तीने सत्कार्य कसं करता येतं याचं आधुनिक काळातील चालतं-बोलतं उदाहरण म्हणजे गाडगेबाबा.
बाबांचं १९५५ मध्ये ध्वनिमुद्रित झालेलं कीर्तन उपलब्ध आहे. त्यात ते अनिष्ट रूढीपरंपरा, व्यसनाधीनता यावर बोलतात आणि शिक्षणाचं महत्त्व श्रोत्यांना सोप्या शब्दांत पटवून देतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या वेळी बोलताना बाबा म्हणाले होते की, भाऊरावांचं शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य अपूर्व आहे. योग्य वेळी संधी मिळाली असती तर मीसुद्धा शिक्षण घेतलं असतं.

अर्थात त्यांचं अनुभवसिद्ध ‘शिक्षण’ अफाट होतं. त्यामुळेच ते रूढार्थाने शिक्षण घेतलेल्या अनेकांना प्रेरणास्थान वाटले. तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर गाडगेबाबांचे निस्सीम भक्त झाले. बाबांचे निष्ठावंत सहकारी त्यांच्या कार्याचा व्याप सांभाळत असत.

कोकणात खारेपाटण येथे कीर्तनासाठी गेले असताना बाबांना त्यांचा मुलगा गोविंदा गेल्याची दु:खद बातमी समजली. क्षणभर स्तब्ध राहून त्यांनी आपलं दु:ख आतल्या आत गिळलं आणि ते कीर्तनासाठी उभे राहिले. यात कठोरपणा नव्हता, तर ‘सुखे-दु:खे समे कृत्वा’ हे तत्त्वज्ञान पचवल्याची ती साक्ष होती.

बाबांचं मोठेपण महाराष्ट्राला ठाऊक होतंच. परंतु त्यांचं ‘दर्शन’ रुपेरी पडद्यावर अजरामर करावं असं आचार्य अत्रे यांनी ठरवलं. ‘महात्मा फुले’ या चित्रपटाच्या सुरुवातीला ‘मंगलाचरण’ म्हणून अत्रे यांनी गाडगेबाबांचं महात्मा फुले यांच्याविषयीचं मनोगत मोजक्या शब्दांत चित्रित केलं. ती चार-पाच वाक्यं आणि बाबांचं प्रसिद्ध भजन ‘देवकीनंदन गोपाला’ आपल्याला पाहायला मिळतं. एका ‘क्लोज-अप’मध्ये बाबांचं करारी आणि सात्त्विक व्यक्तिमत्त्व दिसून येतं.
‘एक तरी ओवी अनुभवावी’ असं ज्ञानेश्‍वरीबाबत म्हटलं जातं तसंच गाडगेबाबांच्या शिकवणुकीतलं अंशात्मक ज्ञान जरी आत्मसात करता आलं तरी समाजाचं भलं होईल.