शेतकऱयांच्या आंदोलनाची निर्भर्त्सना, कृषिमंत्र्यांना कोर्टात खेचले

24

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

शेतकऱयांचे आंदोलन म्हणजे निव्वळ चमकोगिरीसाठी पब्लिसिटी स्टंट असतो असे बेताल वक्तव्य करणारे मोदी सरकारमधील केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्यावर खटला भरण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी त्यांना कोर्टात खेचले आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात राधामोहन सिंग यांच्यावर खटला भरण्यात आला आहे.

कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी सध्या देशभरात शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. त्यात मध्य प्रदेश, हरयाणा, पंजाबसहित २२ राज्यांतील शेतकरी सहभागी झाले आहेत. १ जूनपासून सुरू झालेले हे दहा दिवसांचे आंदोलन आणखी तीक्र होण्याच्या मार्गावर आहे. मात्र केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी न्याय्य मागण्यांसाठी शेतकऱयांच्या चाललेल्या आंदोलनाची संभावना ‘पब्लिसिटी स्टंट’ अशी केली आहे.

राधामोहन काय म्हणाले होते…

देशात १२ ते १४ कोटी शेतकरी आहेत. त्यातील काही हजारच शेतकरी हे शेतकरी संघटनांशी संबंधित असतात असे सांगत कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी शनिवारी शेतकऱयांच्या आंदोलनावर तोफ डागली होती. मीडियात झळकण्यासाठी वेगळे काही तरी करून दाखवण्याची गरज असते. त्यामुळे चमकोगिरीसाठी शेतकरी हे आंदोलनाची स्टंटबाजी करतात असा आरोप त्यांनी केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या