केस गळण्याच्या समस्येला कंटाळून इंजिनिअरची आत्महत्या

सामना ऑनलाईन । मदुराई

तमिळनाडूच्या मदुराईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केस गळतीच्या समस्येला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर. मिथुन राज असं या २७ वर्षीय तरुणाचं नाव असून तो मदुराईतील जयहिंदपुरमचा रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुनला डोक्यावरील त्वचेच्या विकारामुळे केस गळती सुरू झाली होती. केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असल्याने त्याने त्यावर अनेक औषधोपचार सुरू केले. मात्र, केस गळायचे काही थांबले नाहीत. त्यामुळे तो अधिकच निराश झाला. चेन्नईतील इन्फोसिसमधून आर. मिथुन राज याने करिअरला सुरुवात केली होती. काही वर्षे तिथे नोकरी केल्यानंतर तो गेल्या वर्षीच बंगळुरूच्या आयटी कंपनीत नोकरीला लागला. मिथुनच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे.

मिथुनची आई वासंती यांनी त्याच्या लग्नासाठी मुलगी पाहायला सुरुवात केली होती. मात्र केस गळतीमुळे मिथुन तणावात होता. त्याने या समस्येबाबत त्याच्या आईलाही सांगितले होते. मिथुनची आई वासंती मंदिरात गेलेली असताना त्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंदिरातून घरी परतल्यावर त्याच्या आईला मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवून रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.