सायबर हल्ल्याची अफवा; विमाने रखडली, हजारो प्रवासी खोळंबले

सामना ऑनलाईन,मुंबई

जगातील शेकडो एअरलाइन्स कंपन्या वापरत असलेल्या सॉफ्टवेअरची सिस्टीम अचानक फेल झाल्याने जगभरातील विमानतळांवर आज गोंधळ उडाला. नक्की काय झाले हे सुरुवातीला कुणाच्याच लक्षात आले नाही. संगणकच प्रतिसाद देत नसल्याने विमानतळावरील कामकाज ठप्प झाले. विमान उड्डाणे थांबवावी लागली. त्यामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर रखडले. त्यातच हा सायबर हल्ला असावा अशा अफवेलाही ऊत आला होता.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास लंडनचे हिथ्रो आणि गॅटविक, पॅरिसचे चार्ल्स दि गॉले, झुरीच, मेलबोर्न, जोहान्सबर्ग, बाल्टीमोर, सिंगापूरचे चांगी, जपानचे टोकियो आणि वॉशिंग्टनमधील रेगन या विमानतळांवरील संगणक यंत्रणा अचानक ठप्प झाली. त्यामुळे चेकिंग व अन्य कामे बंद करावी लागली. हजारो प्रवाशांना रांगेत ताटकळत राहावे लागले. ऑनलाइन तपासणीही बंद पडली. संगणक यंत्रणा कशामुळे ठप्प पडली याचे कारण शोधण्याची धावपळ सुरू झाली तेव्हा प्रवाशांना काहीतरी गडबड झाल्याचे समजले.

विमानतळांवर वापरल्या जाणाऱया ‘ऍमादियस आल्टीआ’ या सॉफ्टवेअरच्या सिस्टीममध्ये बिघाड झाल्याचे काही वेळानंतर उघड झाले. प्रवाशांमध्ये घबराट पसरू नये या बिघाडाची माहिती जाहीर केली गेली. ऑनलाइन नेटवर्कच नसल्याने विमानांची उड्डाणेही थांबवणे भाग पडले. ऑनलाइन बुकिंग आणि अपडेटिंगही थांबले. आयटी तज्ञांनी तत्काळ हालचाल करून यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले. दुपारी साडेअकरानंतर यंत्रणा पुन्हा सुरू झाली. जगातील १२५ एअरलाइन्स कंपन्या ‘ऍमादियस आल्टीआ’ सॉफ्टवेअर वापरतात. त्यातील १०८ कंपन्या त्याचा वापर चेक-इन्स आणि बोर्डिंगसाठी करतात.