गोष्ट मांडायला आवडते! – सोहम बांदेकर

16

घरात अभिनयाची पार्श्वभूमी असतानाही आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम निर्मिती क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे. ‘स्टार प्रवाहवर नुकत्याच दाखल झालेल्या ललित 205’ या मालिकेचा तो निर्माता आहे. अभिनयापेक्षा पडद्यामागे राहून गोष्ट मांडायला मला आवडते, असे सोहम सांगतो. त्याच्याशी केलेली खास बातचीत.

नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी ‘ललित 205’ ही मालिका नुकतीच ‘स्टार प्रवाह’वर सुरू झाली आहे. या मालिकेद्वारे सोहम बांदेकर निर्माता म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करतोय. अभिनयाऐवजी निर्मितीकडे कसा वळलास याबाबत सोहम म्हणाला, मी अभिनयातच करिअर करावे असा आग्रह आई-बाबांनी कधीच धरला नाही. मास मीडियाचा कोर्स करताना फिल्म मेकिंगची आवड माझ्यात निर्माण झाली. मी स्क्रिप्ट लिहू लागलो, ती गोष्ट कशी मांडायची याचा विचार करू लागलो. त्याच वेळी आपण पडद्यामागे काम करायचं हे मी मनाशी पक्कं केलं.

आई-बाबा अभिनयाच्या क्षेत्रात असल्याने निर्मिती क्षेत्रात त्यांचे कशाप्रकारे मार्गदर्शन मिळते, याबाबत तो म्हणाला, आमच्या प्रॉडक्शनची ‘नांदा सौख्यभरे’ मालिका सुरू असताना शूटिंगवेळी मी सेटवर हजर असायचो. कुठल्या वेळी कसे निर्णय घेतले जातात हे त्यावेळी मला शिकायला मिळाले. मी नवखा असल्याने साहजिकच माझ्याकडून काही चुका होतात. त्या वेळी आई-बाबा मला त्याबाबत नक्कीच मार्गदर्शन करतात. त्याशिवाय सेटवर स्पॉट दादांपासून ते दिग्दर्शकापर्यंत असलेली अनुभवी मंडळी यांचेदेखील मला मोलाचे मार्गदर्शन मिळते.

सोहम अभिनयात कधी पदार्पण करणार? असा प्रश्न त्याला विचारला जातो. ‘सध्या तरी मी अभिनयाचा विचार केला नाही. माझा संपूर्ण फोकस निर्मितीवर आहे. दर्जेदार कलाकृती मला प्रेक्षकांपुढे सादर करायच्या आहेत.’ असे सोहम सांगतो. पडद्यामागे राहून मी सध्या नवनवीन गोष्टी शिकतोय. घरातल्यांचा सपोर्ट आहे म्हणून उगाच अभिनय करण मला पसंत नाही, असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले.

आजकालच्या तरुणांना फॅमिली ड्रामा बघायला आवडत नाही. परंतु ‘ललित 205’ ही मालिका सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आपलीशी वाटेल यादृष्टीने कथानक गुंफण्यात आले आहे. प्रेक्षक आमच्या प्रयत्नांना नक्कीच पसंती देतील, असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला.

वेब सीरिज बनवायचीय!

सध्या सर्वच वयोगटातील प्रेक्षक आवर्जून वेब सीरिज पाहतायत. भविष्यात एखादी दर्जेदार मराठी वेब सीरिज बनवण्याची माझी इच्छा आहे. मराठी सिनेमा आणि नाटकांची निर्मिती करायला आवडेल, असेही तो सांगतो.