रविवारी कंकणाकृती सूर्यग्रहण

सामना ऑनलाइन । चिले

जगभरातल्या खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्या रविवार २६ फेब्रुवारी २०१७ रोजी सूर्यग्रहण असणार आहे. सूर्यासमोरून चंद्राचे भ्रमण होणार आहे. या सूर्यग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सूर्यग्रहण कंकणाकृती असणार आहे. त्यामुळे या विलक्षण योगाला अनुभवण्याची सुवर्णसंधी तमाम खगोलप्रेमींना मिळणार आहे. या सूर्यग्रहणाची सुरुवात चिलेमधून होईल, तर दक्षिण अमेरिकेमध्ये सकाळपासून ग्रहण दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागराच्या भागात हे सूर्यग्रहण दिसेल. नैऋत्य अफ्रिकेमध्ये हे सूर्यग्रहण संपेल.

मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतीय खगोलप्रेमी या ग्रहणाला मुकणार आहेत. कारण, हे सूर्यग्रहण केवळ लॅटिन अमेरिका, नैऋत्य अफ्रिका, प्रशांत महासागर, अटलांटिक आणि अंटार्टिका या भागात दिसणार आहे. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. या ग्रहणात सुर्याच्या प्रकाशाचा आकार कंकण किंवा बांगडीसारखा असतो. त्यामुळे कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळणे ही एक पर्वणी असते. या पुढील सूर्यग्रहण २१ ऑगस्ट २०१७ रोजी असणार आहे आणि ते अमेरिकेमध्ये दिेसेल.