२०१९पासून गाड्यांमध्ये हे फीचर्स असणं अनिवार्य

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जुलै २०१९ पासून बनणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर्स, स्पीड अलर्ट सिस्टीम इत्यादी फीचर्स देणं अनिवार्य असणार आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने असा आदेश जारी केला आहे. हे फीचर्स सध्या फक्त लग्झरी गाड्यांमध्येच उपलब्ध आहेत. पण, २०१९ पासून हे फीचर्स सर्व लाईट मोटर व्हेइकल (चारचाकी) गाड्यांमध्ये देणं अनिवार्य असणार आहे.

हिंदुस्थानात होणाऱ्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१६मध्ये रस्ते अपघातात मृत पावलेल्या दीड लाख लोकांमध्ये ७४ हजार मृत्यू हे वेगात गाडी चालवण्यामुळे झाले आहेत. वेगामुळे वाढणारं अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय रस्तेवाहतूक आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे.

या फीचर्सखेरीज गाड्यांमध्ये मॅन्युअल ओव्हरराईड सिस्टीम बसवणंही बंधनकारक असणार आहे. या सिस्टीममुळे गाडी लॉक झाली तरीही आत अडकलेली व्यक्ती बाहेर येऊ शकेल. तसंच रिव्हर्स पार्किंग अलर्ट सिस्टीममुळे पार्किंगच्या वेळी होणारे अपघात टाळता येऊ शकतात, म्हणून ते फीचरही गाड्यांमध्ये बसवणं अनिवार्य असणार आहे.