मालवण पंचायत समिती सभापतीपदी सोनाली कोदे

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण पंचायत समिती सभापतीपदी कोळंब पंचायत समिती मतदार संघाच्या सदस्या सोनाली कोदे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार समीर घारे यांनी शुक्रवारी त्यांची निवड जाहीर केली. पंचायत समितीच्या इतिहासात कोळंब पंचायत समिती मतदार संघास चौथ्यांदा सभापतीपदाचा मान मिळाला आहे. यात सर्वाधिक तरुण सभापती म्हणून कोदे यांची निवड झाली.

गेल्या सव्वा वर्ष कालावधीत कोदे यांनी मतदार संघातील विविध प्रश्न व समस्यांवर आक्रमक भूमिका मांडली होती. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

पंचायत समितीच्या सभापती मनीषा वराडकर यांनी सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. या पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने व कोदे या सत्ताधारी गटात एकमेव राखीव उमेदवार असल्याने या पदावर सोनाली कोदे यांचीच वर्णी लागणार हे निश्‍चित मानले जात होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत मालवण तालुका विकास आघाडीच्यावतीने सोनाली कोदे यांनी सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी समीर घारे यांच्याकडे सादर केला. दुपारी तीन वाजल्यानंतर निवडणूक प्रक्रीया पार पडली. सभापतिपदासाठी कोदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असल्याने नुतन सभापती म्हणून कोदे यांची बिनविरोध निवड घारे यांनी जाहीर केली.