सबका साथ, सबका विकास हा तर ड्रामा; सोनिया गांधींचा सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी. ज्यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर गलितगात्र पक्षाला नवसंजीवनी दिली.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी  मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेली चार वर्ष काँग्रेसला नष्ट करण्यासाठी भाजपकडून ‘साम-दाम दंड-भेद’ वापरत उघड प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप त्यांनी केला.

‘काँग्रेसचे अस्तित्व हे लोकांच्या ऱ्हदयामध्ये आहे. हे त्यांना माहिती नाही. आम्ही अहंकार आणि सुडापासून मुक्त हिंदुस्थान बनवण्यासाठी संघर्ष करु’, असे सोनिया यावेळी म्हणाल्या.

‘सबका साथ, सबका विकास ड्रामेबाजी’

मोदी सरकारच्या  ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेची सोनियांनी आपल्या भाषणात जोरदार खिल्ली उडवली. ‘सरकारची ही घोषणा म्हणजे निव्वळ ड्रामेबाजी आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते २०१४ पासून अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये काम करत आहेत. या कार्यकर्त्यांचे मी आभार मानते. काँग्रेस हा केवळ पक्ष नसून ती एक विचारधारा आहे. गेली १३३ वर्ष ही विचारधारा देशाचा अभिन्न भाग बनलीय. सर्व घटकांचा यामध्ये सहभाग आहे’, असा दावा सोनिया गांधी यांनी या भाषणामध्ये केला.

कर्नाटकमध्ये जिंकण्याचा विश्वास

कर्नाटक विधानसभेच्या मे महिन्यात निवडणुका होणार आहेत. कर्नाटक हे काँग्रेसच्या ताब्यात असलेले एकमेव मोठे राज्य असल्याचे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. ४० वर्षांपूर्वी कर्नाटकातील चिकमंगळूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत इंदिरा गांधी विजयी झाल्या, आणि देशाचे राजकारण बदलले. आताही याची पुनरावृत्ती होईल असे सोनियांनी सांगितले.

‘राजकारणात येण्याची इच्छा नव्हती’

आपल्याला राजकारणामध्ये येण्याची इच्छा नव्हती. पण पक्षाची स्थिती ढासळत असल्याने यावं लागलं असे सोनियांनी यावेळी सांगितले. तुमच्या पाठिंब्यामुळेच मला शक्ती मिळाली, असे सोनियांनी यावेळी स्पष्ट केले.

soniya-rahul-hug

भाषणानंतर राहुल गांधींची घेतली गळाभेट

सोनिया गांधी यांनी भाषणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची गळाभेट घेतली. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासूनचे हे पहिलेच अधिवेशन आहे.  केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या मनात द्वेष निर्माण करत असून देशामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला होता.