शेतकरी असल्याने लग्नाळूंना कोणी मुलगी देईना

सामना ऑनलाईन, बुलडाणा

एक कोटी २० लाखांची जमीन, लायब्ररी सायन्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण असूनही बुलडाण्यातील एका तरूणाला लग्नासाठी कोणी मुलगी द्यायला तयार नाहीये. ३२ वर्षांच्या किशोर सावळेत कोणतंही व्यंग नाहीये, किंवा नाव ठेवण्यासारखी गोष्टही नाहीये तरीही आत्तापर्यंत त्याला ३० ठिकाणहून नकार कळविण्यात आला आहे. कारण काय आहे माहिती आहे ? कारण आहे की किशोर हा शेती करतो, म्हणजेच शेतकरी आहे. शेतकऱ्याला मुलगी देण्यापेक्षा शिपायाला नोकरी देणं हल्ली मुलींचे वडील पसंत करत असल्याचं किशोरचं म्हणणं आहे.

किशोर हा डोंगर शेवळीचा रहिवासी आहे. त्याने ज्या वधूपित्यांनी त्याला नकार दिला, त्यांना नकाराचं कारण विचारलं होतं. या सगळ्यांनी शेतकऱ्याच्या घरी आमची मुलगी द्यायची नाही असं उत्तर दिल्याचं त्याचं म्हणणं आहे. विदर्भातील हा भाग शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. निसर्गाने साथ दिली नसली तरी किशोरचं दर महिन्याला २० हजारांचं उत्पन्न आहे. मात्र शेतकरी आत्महत्यांच्या बातम्यांमुळे धसका घेतल्याने वधूपित्यांनी शेतकऱ्याच्या घरी आपली मुलगी न देणं पसंत केलं आहे. किशोरची मुलीकडून ती फक्त शिकलेली असावी इतकीच अपेक्षा आहे, तरीही लग्न होत नसल्याने किशोरने आता शेती सोडून नोकरी करण्याचा विचार करायला सुरुवात केली आहे.

कर्नाटकातील बेळगावातील विश्वास बेळेकरांनाही शेतकरी असल्याने आत्तापर्यंत अनेक मुलींनी नकार दिला आहे. त्यांच्या बहिणीही शेतकऱ्याशी लग्न करायला तयार नसल्याने शेतकऱ्यापेक्षाही कमी कमावणाऱ्या व्यापाऱ्यांशी त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. विविध कारणांमुळे २००१ ते २०११ दरम्यान ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी शेती करणं सोडून दिलं होतं. या कारणांमध्ये आता लग्न न होणं या कारणाची भर पडल्याने शेती सोडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या प्रचंड वाढल्याचं सांगितलं जात आहे.