धार्मिक पर्यटनाचे बेत आखणाऱ्यांसाठी नवा पर्याय

सामना ऑनलाईन, मुंबई

हिंदुस्थानात धार्मिक पर्यटन हा अत्यंत आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. ही गोष्ट लक्षात घेता एसओटीसी नावाच्या पर्यटन कंपनीने ‘दर्शन’ या नावाने धार्मिक पर्यटन आकर्षक पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने देशातील ६० निवड मंदिरांची निवड केली आहे. ज्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, द्वारका आणि सोमनाथ मंदिर, कामाख्या मंदिर अशा मंदिरांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लंग, पंच महाभूतांचे दर्शन अशा वेगळ्या धार्मिक सहलींचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.

या सहलींचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरांमध्ये पर्यटकाच्या नावाने आधीच पूजेची वेळ निश्चित केलेली असेल, त्यामुळे त्याचा वेळ वाचेल. पूजा, होम अभिषेक यांचा या सहलीसाठीच्या किंमतीमध्ये समावेश असणार आहे. मंदिरांमध्ये असलेल्या गर्दीबाबत आणि प्रचंड मोठ्या रांगाबाबत या कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता ते म्हणाले आम्ही रांगा तोडून किंवा चुकीच्या मार्गाने पर्यटकांना मंदिरात नेणार नाही, मात्र या पर्यटकांची पूजा आधीच निश्चित झाली असल्याने त्यांना नियमानुसार प्राधान्य दिलं जाईल. पर्यटकांची मंदिरात व्यवस्थित सोय व्हावी म्हणूनच सुरूवातील ६० मंदिरांची निवड करण्यात आली आहे. यासाठी इ-पूजा या ऑनलाईन पोर्टलसोबत हातमिळवणी केली आहे. या पर्यटकांना सुलभ दर्शन आणि पूजेसोबेतच राहण्याची आणि फिरण्याची उत्तम सोय केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.

या सगळ्या सहली या ग्राहकांच्या आवडीनुसार असतील असं कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे. म्हणजेच एखाद्या पर्यटकाला दर्शनासोबतच सुट्टीचा उपभोग घ्यायचा असेल तर त्याच्या आवडीनुसार हॉटेल बुक केली जातील. त्याच्या निवडीनुसार दिवसांची संख्या कमी-जास्त केली जाईल आणि त्याला रेल्वे, वाहन किंवा विमान प्रवासाचे पर्यायही उपलब्ध करून दिले जातील असं या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विशाल सुरी यांनी सांगितले.  ८,६०० रूपयांपासून सहलींचे पर्याय सुरू होतात, जर अतिरिक्त सुविधा नको असतील तर सगळ्यात महागडी धार्मिक सहल ही ४५ हजारांपर्यंत जाऊ शकते असं एसओटीसीतर्फे सांगण्यात आलं आहे.